शरद पवार यांना जैन मुनींचा सवाल, तुमचं शाकाहाराबद्दल मत काय?

जैन समाजाचे महाराज मंगळवारी बारामती येथे आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जैन मुनींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यात धर्माबाबतची चर्चा झाली. शरद पवार यांना जैन मुनींनी आहाराबाबत प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.

बारामतीतील महावीर भवनमध्ये व्यापाऱ्यांचा मेळावा शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. महावीर भवनमध्ये आलेल्या विशालसागरजी महाराज, धवलसागरजी व उत्कृष्टसागर महाराजांचे शरद पवारांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जैन धर्माविषयी महाराजांशी चर्चा केली. जैन मुनींनी शरद पवार यांच्या गळ्यात स्वागताचा हार घातला. योगायोगाने त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली.

बारामतीत आलेल्या जैन मुनींनी शरद पवार यांनी विचारले, पवार साहेब तुमचे शाकाहाराबाबत मत काय आहे? त्यावर प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, आजकाल मी शंभर टक्के शाकाहारी आहे. याआधी मी शाकाहारी नव्हतो. परंतु मागच्या एका वर्षांपासून मी पूर्णतः शाकाहारी आहे, असे उत्तर शरद पवार यांनी दिले. त्यानंतर शरद पवार म्हणाले की, आज आनंदाचा दिवस आहे. दुष्काळी दौऱ्यासाठी मी जेव्हा निघतो, तेव्हा पावसाची सुरुवात होते, असा माझा अनुभव आहे. हे पावसासाठी चांगले वर्ष आहे. त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.