सेमिस्टरला नापास झालो, आता अभ्यास नीट करून फर्स्टक्लासमध्ये पास होऊ; सुप्रिया सुळे यांचा विश्वास

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला तीन राज्यात बहुमत मिळाले आहे. तर, काँग्रेसला फक्त तेलंगणावर समाधान मानावे लागले आहे. या पाच राज्यांच्या निवडणुका म्हणजे लोकसभेची सेमी फायनल होती, असे राजकीय तज्ज्ञ सांगत होते. त्यामुळे या निकालांकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले होते. आता या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाल्याने लोकसभा निवडणुकीतही भाजपाला चांगली संधी मिळू शकते, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ वर्तवत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सेमीफायनलमध्ये पराभव झाला असला तरी फायनलला आम्हीच जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यशाला अनेक भागीदार असतात, पण अपयश एकटेच असते. आमच्या आयुष्यातील सर्वांत मोठे अपयश मागच्याच आठवड्यात आले आहे. त्यामुळे आम्ही दुःखी आहोत. आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पण झाले ते तर आहेच ना. आता त्यात किती आपण रमत बसणार? एप्रिलमध्ये पुन्हा परीक्षा आहे. सेमिस्टरला नापास झालो म्हणून फायनलला नापास होऊ असे काही नसते. अभ्यास नीट केला तर फर्स्टक्लासमध्येही पास होऊ, काही सांगता येणार नाही, असे संगत त्यांनी फायनलमध्ये आम्हीच बाजी मारणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.

आता चार राज्यात पराभव झाला. म्हणून त्यातच रमत बसायचे नाही. आता कपडे झटकून पुन्हा कामाला लागायचे. लोकसभा निवडणुकीसाठी सहाच महिने उरले आहेत. या सहा महिन्यातही सगळे चांगलेच होणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. माझा सध्या सर्वाधिक वेळ फोकस कामातून इतर कामात जातो. माझा वकिलांशी कधी संबंध आला नव्हता. मराठी माणसाच्या संस्कार असतात. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. ते इतक्या वेळा बिंबवलेलं असते. त्यामुळे मी पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढले तेव्हा मला माझी आज्जीच दिसली. पण आता मी पायरी चढले, आता माझ्याकडे उतरण्याचा मार्गच नाही. पण या गोष्टी होत असतात, असा अनुभवही सुप्रिया सुळेंनी यावेळी शेअर केला.