
देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे खाशाबा जाधव यांच्या साताऱयामध्ये तब्बल 58 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा फड रंगणार आहे. 26 ते 28 ऑक्टोबरदरम्यान साताऱयातील देगावमध्ये 23 वी वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व 24 वी वरिष्ठ ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सातशेहून अधिक कुस्तीपटू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, वरिष्ठ उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, बीव्हीजी इंडिया लि.चे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड, राष्ट्रीय कुस्ती पंच दिलीप पवार, ललित लांडगे व अमोल बुचडे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने, बीव्हीजी इंडिया लि.च्या विशेष सहकार्याने आणि निकाळजे ग्रुप व एन. बी. ग्रुप, सातारा यांच्या वतीने या दोन्ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
n राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी होणार निवड
वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व वरिष्ठ ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील विजेते खेळाडूंची 10 ते 13 नोव्हेंबरदरम्यान गोंडा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱया वरिष्ठ गट पुरुष फ्री-स्टाइल, ग्रीको रोमन व वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड होणार आहे.क़
n स्टार कुस्तीपटूंची हजेरी
राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणी 28 ऑक्टोबरला राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राची वरिष्ठ गट फ्री-स्टाइल विभागाची कुस्ती स्पर्धा होणार आहे. या निवड चाचणी स्पर्धेत जागतिक व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेता राहुल आवारे, ऑलिम्पियन नरसिंग यादव, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, ज्युनियर राष्ट्रीय विजेता पृथ्वीराज पाटील असे अनेक स्टार मल्ल शड्डू ठोकणार आहेत.
































































