
71 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुणे ग्रामीण, रत्नागिरी, मुंबई उपनगर पूर्व या संघांनी महिला विभागाच्या उपांत्य फेरीत प्रेवश केला आहे. पुणे ग्रामीण संघाने सांगली संघावर 46-23 अशी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे 21-8 अशी आघाडी होती. पुणे ग्रामीण संघाच्या सलोनी गजमल हिने सुरेख खेळ केला. तर मंदिरा कोमकर हिने पकडी घेतल्या. सांगली संघाच्या श्रद्धा माळी हिने एकाकी लढत दिली. रत्नागिरी संघाने पालघर संघावर 26-24 असा निसटता विजय मिळविला. मध्यंतराला रत्नागिरी संघ 8-10 असा पिछाडीवर होता. रत्नागिरीच्या सिद्धी चाळके, समरिन बुरोडकर यांनी चढाया केल्या. तर तस्मिन बुरोडकर हिने पकडी घेतल्या. पालघरच्या जुली मिस्किता, ऐश्वर्या पाटील यांनी चांगली लढत दिली. तिसऱया सामन्यात मुंबई उपनगर पूर्व संघाने ठाणे शहर संघावर 33-15 अशी मात केली. मुंबई उपनगर पूर्वच्या हरजित सिंधू व याशिका पुजारी यांनी आक्रमक खेळ केला.