
सामना ऑनलाईन । मुंबई
सीबीएसई, आयसीएसई शाळांत विद्यार्थ्यांना घालण्याचा पालकांचा वाढता कल आहे. या शाळांना टक्कर देण्यासाठी सीबीएससी, आयसीएसईच्या धर्तीवर राज्याचे स्वतःचे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शैक्षणिक बोर्ड (एमआयईबी) सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील १३ शाळा या बोर्डाशी जोडल्या जाणार असल्याची घेषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली. ते म्हणाले, मराठी, हिंदी, ऊर्दू या मातृभाषेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही केंद्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बोर्डांच्या दर्जाचे शिक्षण घेता यावे हाच या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय बोर्ड निर्माण करण्यामागचा हेतू आहे. पहिल्या टप्प्यात यासाठी १३ शाळा निवडण्यात आल्या असून त्यांना या ‘एमआयईबी’च्या अभ्यासक्रमाशी संलग्न केले जाणार आहे.
‘एचएससी-एसएससी‘नंतर राज्यात दुसरे बोर्ड
राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एचएससी-एसएससी हे बोर्ड राज्य सरकारने सुरू केले. त्यानंतर आता ‘एमआयईबी’ हे दुसरे स्वतंत्र बोर्ड राज्य सरकार सुरू करणार आहे. या बोर्डाची प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी शाळा असणार असून टप्प्याटप्प्याने या शाळा वाढविण्यात येणार आहेत. ‘एमआयईबी’ ही एक स्वायत्त संस्था असेल. या संस्थेला त्यांच्या शाळांसाठी अभ्यासक्रम तयार करण्याचे आणि परीक्षा घेण्याचे अधिकार देण्यात येतील.




























































