साखर कारखाने होणार मालामाल, अडीच हजार कोटी रुपयांची साखर निर्यात करणार

365

राज्यात यंदा साखरेच्या उत्पादनात मोठी घट होणार असली तरी कारखाने मात्र मालामाल होणार आहेत. मागील वर्षी रेकॉर्डब्रेक साखरेचे उत्पादन झाले असल्याने सर्वच कारखान्यांकडे साखरेचा मोठा साठा शिल्लक आहे. त्यापैकी तब्बल साडेअकरा लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याबाबतचे करार झाले आहेत. त्यामुळे कारखान्यांना तब्बल अडीच हजार कोटी रुपये मिळणार असल्याचे समोर आले आहे.

देशातील साखरेचा साठा विचारात घेता केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कारखान्यांना 18.75 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सहकारी तत्त्वावर चालणाऱया कारखान्यांनी सुमारे 6.31 लाख मेट्रिक टन तर खासगी कारखान्यांनी पाच लाख मेट्रिक टन साखर निर्यातीसाठी करार केले आहे. त्यापैकी सुमारे पाच लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात प्रक्रिया सुरू झाली आहे. सरासरी 2400 ते 2500 रुपये प्रति क्विंवटल एवढा दर या साखरेला मिळणार आहे. इराण, इराक, दुबई, बांगलादेश, श्रीलंका, केनिया, संयुक्त अरब अमिरत आणि आफ्रिकन देशात साखरेची निर्यात केली जाणार आहे. त्यामुळे साखरेची निर्यात करणाऱया कारखान्यांना एकरकमी पैसे मिळणार असल्याने आर्थिक चणचणीचा सामना करणाऱया कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्राकडून मिळणार एक हजार रुपयांचे अनुदान

साखर कारखान्यांकडून खरेदी केल्या जाणाऱया प्रतिक्विंटल साखरेचा दर 3100 रुपये एवढा केंद्र सरकारने निश्चित केला आहे. त्या तुलनेत साखरेची निर्यात कमी दराने म्हणजे 2500 रुपये दराने करावी लागत आहे. किमतीतील हा फरक भरून वाढण्यासाठी केंद्राकडून साखर निर्यात करणाऱया कारखान्यांना प्रति क्विंटलमागे एक हजार रुपये निर्यात प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या