रसिकतेने खाणारी रसिका वेंगुर्लेकर…

>> मानसी पिंगळे, म. ल. डहाणूकर कॉलेज

हास्यजत्रा फेम अभिनेत्री ‘रसिका वेंगुर्लेकर’ हिचा फिटनेस फंडा जरा वेगळा आहे. तिच्या मते फिटनेस सांभाळण्यासाठी दररोज व्यायाम, महागडय़ा जिममध्ये जाणे गरजेचे नसते.

गरजेचा असतो तो शरीराला उपयुक्त असा आहार.

रसिका शरीराला प्रोटिन्स देणारा आहार पसंत करते. त्यामुळे मुख्यतः तिच्या आहारात अंडी असतातच. त्याचबरोबर जेवणात ज्वारीची भाकरी, भाजी किंवा चिकन.

रसिका फुडी आहे, त्यामुळे तिला आवडेल ते ती खाते. फुडी असल्यासोबतच रसिका फार उत्कृष्ट स्वयंपाकही बनवते. तिला वेगवेगळे पदार्थ बनवायला फार आवडतात. तिच्या हातच्या ‘याखनी चिकन पुलाव’ला भलतीच मागणी आहे. अनेकदा तिच्या कुटुंबासह तिचा मित्रपरिवारसुद्धा तिला याखनी चिकन पुलाव आवर्जून बनवायला सांगतो. त्याचबरोबर ती मसूर-भातसुद्धा फार चविष्ट बनवते. रसिकाने हल्लीच एक स्वतःची रेसिपी तयार करत त्याला नाव दिले, ‘ग्रील चिकन इन व्हाइट सॉस’ ही तिच्या घरच्यांची फेवरेट डिश आहे. चिकन मॅरिनेट करून ते बटर आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये ग्रील करायचे. कांदा, लसूण परतून चीलिफ्लेक्स अन् ऑरगॅनोचा वापर करून पाणी टाकून व्यवस्थित शिजवायचे. त्यानंतर त्यामध्ये चीझ स्लाइस किंवा चीझ किसून टाकले की, अगदी कोणाच्याही तोंडाला सहज पाणी सुटेल असा चविष्ट पदार्थ तयार.

जेवण कोणतेही असो व्हेज वा नॉनव्हेज…पण जेवताना रसिकाला दही लागतेच. तिला ताकसुद्धा फार आवडते. रसिकासाठी चॉकलेट्स म्हणजे ऑल टाइम फेवरेट. रसिका हल्लीच हिमाचलला गेली असता तिने धरमशाला येथील मोमोस खाल्ले होते. रसिका म्हणते, ते मोमोस म्हणजे लाजवाब. आजही ती चव जिभेवर रेंगाळते.

रसिकाच्या कुटुंबात तिची आई आणि सासूबाई दोघीही खूपच स्वादिष्ट जेवण बनवतात. रसिका सांगते, सासूबाईंच्या हातच्या चिकन, मटण आणि कोंबडी वडय़ांना तर तोड नाही अन् आईच्या हातच्या पालेभाज्या आणि कारल्याची भाजी जगाच्या पाठीवर कुठेच मिळणार नाही. सर्वांना नकोनकोशी वाटणारी कारल्याची भाजी मला आईच्या हातच्या चवीने पुनः पुन्हा प्रेमात पाडते.

फिटनेस हा फक्त शारीरिक नको, मानसिक फिटनेससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग्य, सात्त्विक आहारासह योग्य अशा प्रदूषणमुक्त वातावरणात वावरणेदेखील फार महत्त्वाचे आहे, असे ती सांगते.

अविस्मरणीय किस्सा

रसिकाने मुलाखतीदरम्यान एक सुंदर किस्सा सांगितला, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’तील कलाकार दत्तू मोरेच्या लग्नासाठी टीममधील इतरही सदस्यांसह नाशिकला जात असताना रसिका गाडी चालवत होती, पण जेवणाची वेळ निघून गेल्याने वाटेत एकही हॉटेल मिळत नव्हते. रसिकाला मटण थाळी किंवा चिकन खायची फार इच्छा झालेली. बराच शोध घेतल्यावर एक हॉटेल मिळाले. हॉटेलचे काम चालू असावे, त्यामुळे हॉटेलची अवस्था इतकीही व्यवस्थित नव्हती. हॉटेलमध्ये प्रवेश करताच जेवणाची वेळ नसल्याने काहीच जेवण तयार नव्हते, पण हास्यजत्रेतील कलाकारांना पाहून हॉटेलमधील सर्वजण फार खूश झाले आणि केवळ पंधरा मिनिटांत चमचमीत मटण तयार केले गेले. हा किस्सा अविस्मणीय आहे.