शेतकरी, आशा वर्कर्स, विदर्भाच्या तोंडाला सरकारने अधिवेशनात पाने पुसली, विरोधकांचे मिंधे सरकारवर टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले. हे अधिवेशन सत्ताधाऱयांच्या इभ्रतीचे धिंडवडे काढणारे ठरले असून अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी, आशा वर्कर्स, विदर्भाच्या तोंडाला सरकारने पाने पुसली. केवळ पंत्राटदारांना पोसण्याचे काम या अधिवेशनात झाले, अशी टीका विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने केली.

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले. त्यानंतर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन सरकारचे वाभाडे काढले. याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना आमदार अॅड. अनिल परब व सचिन अहिर, काँग्रेसचे भाई जगताप उपस्थित होते.

ड्रग्ज तस्करीत मंत्र्यांचे जावई

विदर्भात गारपीट झाली, त्यांना काहीही दिले नाही. विदर्भातील प्रश्न, शेतकऱयांबद्दल अनास्था, घोटाळ्यांची मालिका, भ्रष्टाचाराला ऊत, ड्रग प्रकरण, राजकारणाचे गुन्हेगारीकरण यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. दलित, आदिवासी, मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. ड्रग्ज, गुटखा यांतून महिन्याला कोटय़वधींची उलाढाल होत असून यात मंत्री, त्यांचे बगलबच्चे, मंत्र्यांचे जावई सामील आहेत, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.

अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चुहां – वडेट्टीवार

पाच दिवसीय अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला विरोधकांनी केलेल्या आरोपांवर ठोस उत्तर देता आले नाही. हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चुहां आहे, अशी टीका करत काँग्रेसचा शिपाई म्हणून शेवटपर्यंत लढत राहीन, अशी ग्वाही विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे भाषणावेळी अवसान गळाले होते. भाषणात मोदी महिमा एवढाच मुख्यमंत्री शिंदेंचा अजेंडा राहिला. मोदी गुणगाण गाऊन निवडणुकीला सामोरे जाणे एवढेच त्यांनी ठरवलेले आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.