
छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे शपथ घेऊन आम्हाला एक वर्ष पूर्ण झाले. हे वर्ष कसे गेले, हे भाजपला कळलेही नाही. उरलेली चार वर्षेही कशी जातील हे त्यांना कळणार नाही,’ असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी लगाविला आहे.
जयंत पाटील म्हणाले, एक वर्षात सरकार अनेक संकटांना सामोरे गेले. कोरोनाचे संकट सर्वांत मोठे होते. राज्य सरकारने सर्व पद्धतींचा वापर करून कोरोनाच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्यामुळे त्याचा महसुलावर परिणाम झाला. आता सगळे पुन्हा उभे करण्याचे काम हळूहळू सुरू झाले आहे. जनजीवन पूर्वपदावर आल्यामुळे महिन्या-दोन महिन्यात उत्पन्न वाढेल. त्यानंतर राज्य सरकार अधिक गतीने काम करेल. शपथ घेतल्यानंतर कोरोना येईपर्यंत राज्य सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले. हा धाडसी निर्णयांचा सपाटा आगामी काळातही सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



























































