ग्राहकांच्या डोक्यावर स्थिर आकाराचा भार कायम! वीज वापर घटलेला असतानाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसामुळे राज्यातील विजेची मागणी 23 हजार मेगावॅटवरून 10-12 हजार मेगावॅटपर्यंत खाली घसरली आहे. विजेचा वापर कमी झाल्यानेच मागणीत घट झाली आहे, तरीही वीज ग्राहकांच्या डोक्यावर स्थिर आवाराचा भार कायम असून दिवसाला 70-75 कोटी रुपये मोजावे लागत आहेत.

महावितरणचे राज्यात 2 कोटी 50 लाख वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडून कमाल 23 हजार मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदली जाते. ती योग्यपणे पूर्ण करण्यासाठी महावितरणने 30 हजार मेगावॅटहुन अधिक क्षमतेच्या वीज प्रकल्पसोबत वीज खरेदी करार केलेले आहेत. त्यामुळे महिन्याला स्थिर आकारापोटी दोन हजार कोटी रुपये संबंधित वीज निर्मिती कंपन्यांना मोजावे लागत आहेत. त्याचा भार वीज दरवाढीच्या माध्यमातून ग्राहकांवर पडतो. सध्या कृषी पंपाचा वीज वापर कमालीचा घटल्याने विजेची एकूण मागणी 12 हजार मेगावॅटपर्यंत खाली आली आहे. 16 ऑगस्ट रोजी सर्वाक साडेबारा हजार मेगावॅट, 17 ऑगस्ट रोजी 12 हजार मेगावॅट तर 18 ऑगस्टला 12,235 मेगावॅटपर्यंत विजेची मागणी घटली आहे. विजेचा कमी वापर होत असला तरी त्यावर पडणारा स्थिर आकार कायम तो भार सरकारने उचलल्यास ग्राहकांना दिलासा मिळू शकतो, असे वीजतज्ञ डॉ. अशोक पेंडसे यांनी सांगितले.