
महावितरणच्या गो-ग्रीन पर्यावरणपूरक सेवेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. छापील कागदी वीज बिलाऐवजी ई-मेलने बिल देण्यासाठी महावितरणने गो-ग्रीन सेवा सुरू केली आहे. त्यानुसार एक लाख तीन हजार 918 ग्राहकांनी कागदी बिल नाकारून ईमेलच्या बिलाचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे महावितरणचा वेळ आणि छपाई खर्चात मोठी बचत होत असून ग्राहकांनाही वेळेत बिल मिळत आहे. तसेच गो-ग्रीन बिलाचा पर्याय निवडणाऱया ग्राहकांना महावितरणकडून वीज बिलात दहा रुपयांची सवलत दिली जाते.
महावितरणचे राज्यभरात सुमारे अडीच कोटी ग्राहक आहेत. त्यांनी वापरलेल्या विजेचे रीडिंग घेऊन प्रत्येक महिन्याला संबंधिताला छापील वीज बिल पाठवण्याची प्रक्रिया मोठी वेळखाऊ आहे. अनेकदा बिले मिळत नसल्याच्या तक्रारी येतात. त्याची दखल घेत महावितरणने पर्यावरणपूरक गो-ग्रीन वीज बिल सेवा सुरू केली आहे. एक लाखाहून अधिक ग्राहकांना ई-मेलच्या बिलाला पसंती दिली आहे. सर्वाधिक पुणे विभागातील तब्बल 40 हजार 69 ग्राहकांनी गो-ग्रीनचा पर्याय निवडला आहे. कोकण विभागातील 37 हजार 800 ग्राहकांनी, नागपूर विभागात 13 हजार, संभाजीनगर विभागात 12 हजार ग्राहकांनी हा पर्याय निवडला आहे.




























































