
महावितरण कंपनीची वीजबिल थकबाकी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या महिन्यापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील 90 हजार 726 ग्राहकांनी 24 कोटी 85 लाख रुपयाला महावितरणला थकवले आहे. यामध्ये सर्वांत जास्त साडेनऊ कोटी ही पथदिव्यांची तर त्या खालोखाल घरगुती ग्राहकांची 6 कोटी 40 लाखांची थकबाकी आहे. वसुलीसाठी महावितरणने कठोर पावले उचलली असून अनेक थकबाकीदारांच्या जोडण्या तोडल्या आहेत.
कोरोना काळामध्ये मोठ्या आर्थिक संकटात असलेली महावितरण कंपनी दीड-पावणेदोन वर्षांचा कालावधी लोटला तरी अजून काही सावरलेली नाही. मात्र, कारवाईचा बडगा उगारल्यानंतर वसुलीमध्ये वाढ झालेली दिसत आहे. महावितरण कंपनीची राज्यात सुमारे 16 हजार कोटींवर थकबाकी आहे. कंपनीने सावरण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाकडून काही कठोर निर्णय घेतले आहेत. महावितरण कंपनीने ग्राहकांना संधी देऊन पाहिले तरी अनेक ग्राहकांकडून त्याकडे कानाडोळा केला जात आहे. यापूर्वी 62 कोटींवर असलेली जिल्ह्याची थकबाकी दोन महिन्यांपूर्वी 52 कोटी 39 लाखापर्यंत होती. ती आता काही प्रमाणात कमी झाली आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्यामध्ये हीच थकबाकी 24 कोटी 85 लाखांवर गेली आहे. 90 हजार 726 ग्राहकांकडून ही थकबाकी वसूल होणे बाकी आहे. यापूर्वी दीर्घकाळ बिल न भरणाऱ्या जिल्ह्यातील 936 ग्राहकांचे वीजजोडण्या तात्पुरत्या तोडण्यात आल्या आहेत. ही कारवाई अद्यापही सुरू आहे.
जिल्हा वीजबिल थकबाकीमध्ये घरगुती 71 हजार 137 ग्राहकांकडून 6 कोटी 40 लाख रुपये थकबाकी आहे. वाणिज्य 8 हजार 668 ग्राहकांकडून 3 कोटी 29 लाख, औद्योगिक 1 हजार 359 ग्राहकांचे 1 कोटी 59 लाख, पथदिव्याचे 1 हजार 425 जणांचे 9 कोटी 54 लाख, पाणीपुरवठा 905 ग्राहकांचे 1 कोटी 95 लाख, कृषीच्या 4 हजार 224 ग्राहकांचे 86 लाख, तर सार्वजनिक सेवेतील 1 हजार 998 ग्राहकांचे 1 कोटी 22 लाख असे एकूण 90 हजार 726 ग्राहकांचे 24 कोटी 85 हजार रुपये एवढी महावितरणची थकबाकी आहे.






























































