
बँकेच्या कर्जमुक्तीच्या तगाद्याची स्थानिक पातळीवर दखल न घेतल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न करणारे पनवेलमधील शेतकरी महेंद्र देशमुख यांना सोमवारी न्याय मिळाला आहे. या कर्जप्रकरणाची त्रिदस्यीय समितीमार्फत आठ दिवसांत चौकशी करण्याचे आदेश कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज दिले आहेत.
पनवेलमधील महेंद्र देशमुख यांनी रविवारी त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची तातडीने दखल घेत शेतकरी देशमुख यांना सोडून देण्याचे आदेश दिले आणि त्यांची समस्या जाणून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर आज कृषी मंत्री दादा भुसे यांनी देशमुख यांना त्यांच्या कुटुंबियांसह निवासस्थानी बोलावून घेतले आणि त्यांची केफियत ऐकून घेतली. मी बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतल्याचे बँकेचे म्हणणे असून बँकेचा व्यवहार मान्य नसल्याचे देशमुख यांनी कृषीमंत्र्यांना सांगितले. कृषी मंत्र्यांनी त्यांच्यासोबत सुमारे दोन तास चर्चा केली.
यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, पनवेलचे तहसीलदार अमित सानप, बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापक आणि अन्य अधिकाऱयांसमवेत बैठक घेऊन देशमुख यांना लवकरात लवकर न्याय कसा मिळेल याबाबत सूचना केल्या.
आस्थेने चौकशी
कृषीमंत्र्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱयांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि या प्रकरणाची अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक आणि लेखा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या समितीद्वारे चौकशी करून आठ दिवसांत मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी कृषीमंत्र्यांनी देशमुख कुटुंबीयांची आस्थेने चौकशी करत त्यांना दिलासा दिला.
























































