धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार? भाजप नेत्याने केला दावा

82
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरनंतर एम.एस. धोनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. वर्ल्डकपमधील पराभवाचे खापर धोनीवर फोडले जात असताना भाजप नेत्याने धोनी लवकरच क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश करेन असा दावा केला आहे. भाजप नेते संजय पासवान यांनी हा दावा केला आहे.

आज तक‘शी बोलताना संजय पासवान यांनी धोनीशी भेट घेऊन भाजप सदस्यतेबाबत चर्चा केल्याचे सांगितले. धोनीने क्रिकेटद्वारे देशाची खूप सेवा केली आहे. आता त्याने क्रिकेटमधून संन्यास घेऊन समाज आणि देशसेवेसाठी राजकारणात यावे असेही ते म्हणाले. तसेच या संदर्भात आपली त्याच्याशी चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. धोनीच्या सातत्याने संपर्कात असून लवकरच याबाबत निर्णय घेईन असेही पासवान म्हणाले.

लोकसभा निवडणुकीदरम्यान घेतली होती भेट
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने देशभरातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी घेतल्या होत्या. या अभियानाला ‘संपर्क फॉर समर्थन’ असे नाव देण्यात आले होते. याच अभियाना अंतर्गत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी एम.एस. धोनीची भेट घेतली होती.

याआधी पंजाब काँग्रेसचे मंत्री नवज्योत सिंह सिंद्धू आणि प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू गौतम गंभीर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु सिद्धू यांनी भाजप सोडून नंतर काँग्रेसचा हात हाती घेतला, तर गंभीरला दिल्लीतून तिकीट देण्यात आले आणि आता तो खासदार आहे. तसेच टीम इंडियाचे माजी खेळाडू चेतन चौहान हे देखील भाजपचे खासदार राहिले असून सध्या ते यूपी सरकारमध्ये मंत्री आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या