लेख – ‘चिमणी’चं नवस्वातंत्र्ययुग!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>महेश कोळी

‘‘ट्विटर’ या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रसार जगातील बहुतांश देशांत झालेला आहे. आजघडीला ट्विटरचे जगभरात सुमारे 40 कोटी युजर असून त्यातील अडीच कोटी युजर हिंदुस्थानातीलच आहेत. सध्या ट्विटर पंपनीच्या व्यवस्थापनाच्या पातळीवर फेरबदल झाले आहेत. एलॉन मस्कने ट्विटरची चिमणी ताब्यात घेतल्यानंतर त्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर बदल होण्याच्या शक्यता आहेत. त्यामध्ये मुक्तपणा किती असेल आणि व्यावसायिकता किती असेल हे येणारा काळच सांगेल, परंतु मस्कसारखा उद्योगपती कर्ज काढून एखादी पंपनी खरेदी केल्यानंतर नफापेंद्री धोरणेच राबवणार ही गोष्ट स्पष्ट आहे.

प्रत्यक्षात गेल्या काही काळापासून जग हे कट्टरपंथी आणि डाव्यात विभागले गेले आहे. मस्क यांनी म्हटले की, जगात सामाजिक सद्भाव वृद्धिंगत होण्यासाठी सर्वसमावेशक डिजिटल प्लॅटफॉर्म असणे आवश्यक आहे. या व्यासपीठावर  कोणत्याही हिंसेचा आधार न घेता लोक आपले म्हणणे मांडतील. सध्याच्या काळात जगाला अनेक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यात सोशल मीडियावर चालणारे टोकाचे वैचारिक युद्ध याचाही समावेश करावा लागेल. सध्या इंटरनेट मीडिया हे कट्टरपंथीय आणि डाव्या विचारसरणीत विभागला गेला आहे. दोन्ही गटांचे कट्टर विचार हे केवळ समाजाला विभागत नाहीत, तर द्वेषदेखील पसरविण्याचे काम करत आहेत. अशा प्रकारची शक्यता पाहता भविष्यात गंभीर स्थिती निर्माण होणार नाही, अशी व्यवस्था मस्क तयार करू इच्छित आहेत. या व्यासपीठावर सर्वांचे स्वागत व्हावे आणि सर्वांना बिनधास्तपणे आपले म्हणणे मांडता यावे, असे मस्क म्हणतात. ट्विटर हे जगातील जाहीरातीचे आदर्श व्यासपीठ व्हावे, असे मस्क यांनी जाहिरातदारांना म्हटले आहे.

सध्याच्या काळात इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्म आणि डिजिटल स्पेस अत्यंत महत्त्वाचा घटक ठरत असल्याने ट्विटरचा करार हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. एलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतला अन् ट्विटरला नव्याने वलय प्राप्त झाले. ट्विटरची मालकी येताच एलॉन मस्कने ‘चिमणी मुक्त झाली’ (द बर्ड इज फ्री) असे ट्विट केले. या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. मानवतेच्या मदतीसाठी  आणि सहकार्यासाठी ट्विटरचा ताबा घेत असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. विचार न करता मत मांडणाऱ्या अविचारी लोकांनी ट्विटरच्या प्लॅटफॉर्मचा वापर करू नये, अशी मस्क यांनी अपेक्षा व्यक्त केली. ट्विटरचा उपयोग करण्यासाठी आता पैसेदेखील मोजावे लागतील. ट्विटरच्या धोरणात कालांतराने व्यापक बदल पाहावयास मिळू शकतात.

13 एप्रिल रोजी एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याची ऑफर दिली. मात्र स्पॅम आणि फेक अकाऊंट्समुळे ट्विटर खरेदीचा करार स्थगित केला. त्यानंतर 8 जुलै रोजी मस्क यांनी करार तोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ट्विटर पंपनीने मस्क यांच्या निर्णयाचा विरोध केला आणि कोर्टात धाव घेतली, पण ऑक्टोबर महिन्यात मस्क यांनी आपली भूमिका बदलली आणि करार पूर्ण करण्याची तयारी दर्शविली. यादरम्यान 28 ऑक्टोबरपर्यंत करार पूर्ण करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या कार्यालयात एक दिवस अगोदरच पाऊल टाकले, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मस्क यांनी ट्विट करत म्हटले की, ट्विटरशी करार करण्यामागचा उद्देश म्हणजे आगामी पिढीला कॉमन डिजिटल स्पेस मिळणे होय.  या व्यासपीठावर अनेक विचारसरणीचे लोक कोणत्याही हिंसेशिवाय निकोप चर्चा करतील, अशी अपेक्षा मस्क यांनी व्यक्त केली. कारण भविष्यात ट्विटर हे डावे आणि उजव्या विचारसरणीच्या समर्थकांसाठी एक व्यासपीठ ठरू शकते आणि या माध्यमातून द्वेष पसरविण्याची भीती राहू शकते.

विशेष म्हणजे ट्विटरवर उपलब्ध असणारे साधन हे युजरला चांगल्या रीतीने दिसावे अशा प्रकारची क्रमावली (अल्गोरिदम) एलॉन मस्क हे तयार करू इच्छित आहेत. ट्विटरवर असलेल्या स्पॅम बोट्सला मस्क काढण्याची मस्क यांची तयारी आहे. अर्थात मस्क यांनी ट्विटर व्यवस्थापनाबाबत अद्यापपर्यंत कोणतीही कार्ययोजना तयार केलेली नाही किंवा जारी केलेली नाही. आपण केवळ नोटा छापण्यासाठी ट्विटर ताब्यात घेतलेले नाही, असे मस्क म्हणतात.  मानवतेच्या मदतीसाठी ट्विटर खरेदी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मस्क यांनी पंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल आणि कायदा व्यवहार आणि धोरण प्रमुख विजया गड्डे यांना बाहेरचा रस्ता दाखविला. अनेक अधिकाऱ्यांनी आपल्याला ट्विटरवरील फेक अकाऊंटच्या संख्येवरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मस्क यांनी केला आहे. त्यामुळे मस्क यांनी खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. पराग अग्रवाल यांना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पंपनीचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांच्या राजीनाम्यानंतर ट्विटरचा सीईओ म्हणून नियुक्त केले होते.

मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर हिंदुस्थानचे आयटी आणि माहिती  तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले की, ट्विटर हा हिंदुस्थानातील नव्या आयटी नियमांचे पालन करेल, असा ठाम विश्वास आहे. ट्विटरचा मालक बदलला असला तरी फरक पडणार नाही. हिंदुस्थानचे स्वतःचे कायदे आहेत आणि त्याचे पालन सर्वांनाच करावे लागेल. काही ट्विटर खाती बंद केल्याच्या निर्णयाबाबत बोलताना चंद्रशेखर म्हणाले की, यासंदर्भात लवकरच आयटी कायदा लागू केला जाईल आणि त्याचे पालन सर्वांनाच करावे लागेल. वास्तविक, हिंदुस्थान सरकारने ट्विटरला जुलै महिन्यात आक्षेपार्ह मजकूर काढण्यास सांगितले होते. हे प्रकरण कोर्टातही गेले होते. त्यानुसार ट्विटरने आपल्या व्यासपीठावरून आक्षेपार्ह मजकूर काढण्याची तयारीही दर्शविली होती. कृषी कायदे, कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून होणारे प्रयत्न आणि स्वतंत्र शीख राज्यांबाबत ट्विटरवरून चुकीची माहिती पसरविण्यात आली होती. सरकार आणि ट्विटर यांच्यात बऱ्याच काळापासून संघर्ष सुरू आहे. आता ट्विटरचा मालक बदलल्याने या सोशल मीडियाची भूमिका काय राहते, हे आगामी काळात समजेल. या करारानंतर ट्विटर डावे आणि कट्टरपंथीय ंयांच्यात  ताळमेळ कसे बसवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  मस्क यांनी ‘ट्विटर’मधून कमाई करण्यासाठी ‘ब्लू टिक’ची इच्छा बाळगून असणाऱ्यांकडून शुल्क वसुलीचे संकेत दिले आहेत. डॉलरमध्ये त्याचे मासिक शुल्क निश्चित केले आहेत. या हिशेबाने हिंदुस्थानातील युजरना सुमारे 1600 रुपये खर्च करावे लागतील. अर्थात ‘ब्लू टिक’ असलेले आणि ‘ब्लू टिक’ घेण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या हिंदुस्थानी मंडळींनी एवढे पैसे मोजण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. अशा वेळी ट्विटरचे कामकाज कशा रीतीने चालेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

(लेखक संगणक अभियंता आहेत.)