
सामना प्रतिनिधी । मुंबई
एसटीच्या बस स्थानकावर महिला बचत गटांना दिवाळीचा फराळ विक्री करण्यासाठी एक रुपया नाममात्र दराने जागा उपलब्ध करून देणारी परिवहनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षीपासून सुरू झालेली ‘दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान’ योजना यंदा 2 ते 13 नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकीचे भान राखत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये एसटी महामंडळाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून महिला बचत गटांसाठी दिवाळी फराळाच्या विक्रीची दालने एसटी बस स्थानकाच्या मोकळय़ा आवारात एक रुपया नाममात्र शुल्क आकारून उभी करण्याच्या उद्देशाने ‘दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान योजना’ हा स्तुत्य उपक्रम गेल्या वर्षीपासून राबविण्यात येत आहे. याद्वारे महिला बचत गटाच्या उत्पादनांची विक्री होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी परिवहनमंत्री रावते यांच्या संकल्पनेतून यंदा ही योजना 2 ते 13 नोव्हेंबरदरम्यान कार्यान्वित होत आहे. त्यासाठी संबंधित बचत गटांनी त्या विभागातील विभाग नियंत्रकाकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करून आपली विक्री दालने उभे करू शकतील.




























































