माहिममध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, 1 महिला ठार तर एक जण जखमी

मुंबईतील माहिम परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माहीम पश्चिम येथे बुधवारी सायंकाळी एका रिकाम्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर दुसरी जखमी झाल्याची घटना घडली आहे. बॉम्बे स्कॉटिश शाळेजवळील दिलीप गुप्ते मार्गावरील एक मजली रिकाम्या इमारतीचा पहिल्या मजल्याचा मोठा स्लॅब कोसळल्याची ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासगी कंत्राटदाराकडून मोकळी झालेली इमारत पाडताना स्लॅब कोसळला. यात एका महिलेला स्थानिकांनी वाचवले आणि हिंदुजा रुग्णालयात पाठवले तर दुसरी महिला मजूर ढिगाऱ्यात अडकली होती.अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव करून तिला सायन रुग्णालयात पाठवले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दोन्ही महिला मजूर होत्या.

चंद्रिका यादव ( 32) या  महिलेच्या छातीवर स्लॅबचा काही भाग पडला. त्यांना सुरुवातीला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र नंतर त्यांनी स्वत:ला सायन रुग्णालयात हलवले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.