
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘माझा’ पुरस्कार सोहळा येत्या बुधवारी 15 फेब्रुवारीला होणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये सायंकाळी 7.30 वाजता होणाऱया या सोहळ्यात ‘चारचौघी’ नाटकातील भूमिकेसाठी अभिनेत्री मुक्ता बर्वे तर ‘38 कृष्ण व्हिला’ या नाटकातील भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचा गौरव होणार आहे.
‘माझा’ पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे 15वे वर्ष आहे. याशिवाय या सोहळ्यात ‘सफरचंद’ या नाटकासाठी अभिनेता शंतनू मोघे, सर्वोत्कृष्ट नाटय़लेखनासाठी डॉ. श्वेता पेंडसे (नाटक – 38 कृष्ण व्हिला), सर्वोत्कृष्ट नाटकासाठी ‘चारचौघी’ (जिगिषा नाटय़ संस्था) या नाटकाचा गौरव होणार आहे. तसेच ‘सफरचंद’ नाटकाच्या नेपथ्यासाठी संदेश बेंद्रे आणि सर्वोत्कृष्ट अनुवाद म्हणून ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाकरता अनघा लेले यांचा गौरव होणार आहे. यासह एका युवा दाम्पत्याचा अनोखा गौरवदेखील या सोहळ्यात होणार आहे. प्रशांत लळीत यांच्या संगीत संयोजनाखाली हिंदी-मराठी गीतांची मैफलही या वेळी होणार आहे, अशी माहिती अशोक मुळ्ये यांनी दिली.































































