
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
एका 18 वर्षीय महिलेशी दोस्ती केल्याचे प्रकरण मेजर लिथूल गोगोई यांना महाग पडण्याची चिन्हे आहेत. कश्मीरातील या स्थानिक महिलेशी दोस्ती केल्याप्रकरणी गोगोईंविरुद्ध सुरू केलेली कोर्टमार्शलची (लष्करी कोर्टातील सुनावणी) प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता यासंदर्भात त्यांना शिक्षा म्हणून त्यांची सेवाज्येष्ठता कमी केली जाऊ शकते, असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
चालकाला तंबी मिळू शकते
या प्रकरणात गोगोईंबरोबरच त्यांचा चालक समीर मल्ला याच्याविरोधातही चालवण्यात आलेली कोर्टमार्शलची प्रक्रिया अलीकडेच पूर्ण झाली आहे. आपल्या लष्करी तळावरून परवानगी न घेताच गैरहजर राहिल्याप्रकरणी त्याला कडक शब्दांत कोर्ट मार्शलकडून तंबी मिळण्याची शक्यता आहे.
मार्गदर्शक सूचना असतानाही स्थानिक महिलेशी दोस्ती केली. शिवाय लष्कराच्या कार्यरत भागात डय़ुटी असतानाही तेथून निघून गेले, असे दोन महत्त्वाचे आरोप मेजर गोगोई आणि चालक मल्ला याच्यावर कोर्ट मार्शलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. यासंदर्भात हे दोघे आणि साथीदारांचे जाबजबाब कोर्ट मार्शलने नोंदवून घेतलेले आहेत.
हॉटेलात पोलिसांची कारवाई
एका 18 वर्षीय महिलेसह मेजर गोगोई यांनी हॉटेलात घुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांची हॉटेल कर्मचाऱ्यांशी वादावादी झाली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी गोगोई यांना ताब्यात घेतले होते.
कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरू असताना त्यावेळी तेथे हजर राहण्यास या महिलेने नकार दिला. आपण दंडाधिकाऱ्यांसमोर माझा जबाब मी दिलेला आहे. तोच अंतिम मानण्यात यावा, असे या महिलेने म्हटलेले आहे.

























































