
‘मेक इन इंडिया’मधून अपेक्षित नोकऱ्यांची निर्मिती झाली नाही. पुरेशा नोकऱ्या देण्यास या योजनेला अपयश आले आहे असे स्पष्ट मत लार्सन ऍण्ड टुब्रोचे (एल ऍण्ड टी) ए. एम. नाईक यांनी व्यक्त केले आहे. तसेच देशात उत्पादित झालेल्या वस्तूंऐवजी अनेक कंपन्यांकडून बाहेरून वस्तूंची आयात केली जात आहे असे नाईक यांनी सांगितले.
मागणी आणि गुंतवणूक दोन्ही कमी झाल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाची गती मंदावली आहे. ‘सीएमआय’सह वेगवेगळ्या वेबसाइटवरील डाटानुसार बेरोजगारी वाढल्याचे दिसत आहे. जगात सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेल्या हिंदुस्थानात दरवर्षी नव्याने एक कोटी रोजगारांची निर्मिती करणे आवश्यक आहे; पण देशात नोकऱ्या घटत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘एल ऍण्ड टी’चे चेअरमन ए. एम. नाईक यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. नाईक हे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे प्रमुख आहेत. देशात उत्पादन होणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्याऐवजी अनेक कंपन्या बाहेरील देशांमधून वस्तू आयात करतात हे चिंताजनक आहे, मात्र याची कारणे शोधली पाहिजेत. हिंदुस्थानी कंपन्यांकडे अर्थसहाय्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. पण वस्तू आयात करताना विदेशातील कंपन्यांकडून उधार, सवलत मिळते. एकप्रकारे आपण जॉब (नोकऱ्या) आयात करत आहोत, असे नाईक म्हणाले.
चीनच्या बरोबरीने अर्थव्यवस्था हवी
- चीन आणि हिंदुस्थानची लोकसंख्या जवळपास समान आहे. आपली अर्थव्यवस्थाही चीनच्या बरोबरीने हवी. त्यासाठी अर्थव्यवस्थेचा वेग वर्षाला किमान 12 ते 13 टक्के पाहिजे.
- अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचा फायदा करून घेण्याची संधी हिंदुस्थानसह अनेक देशांना आहे. सध्या थायलंड आणि व्हिएतनाम व्यापारयुद्धाचा फायदा करून घेत आहेत, असे नाईक म्हणाले.
- कौशल्य आणि नोकऱ्या यांचा ताळमेळ नाही
- पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’बाबत खूप बोलले गेले. या योजनेमध्ये आणखी खूप काही करावे लागेल.
- कुशल कामगारांच्या पुरवठय़ाचा विचार करता उत्पादन क्षेत्रात नोकऱ्या निर्मितीमध्ये लक्ष दिलेले नाही. कौशल्य आणि नोकऱ्या यामध्ये ताळमेळ बसत नाही याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले आहे.


























































