
खूप मसालेदार गोष्ट पाहिली की तोंडाला पाणी सुटतं. पण दिसायला आकर्षक असली तरीही एका मर्यादेपलीकडे तिचा आस्वाद घेणं शक्य नसतं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मलंग’ या सिनेमाची स्थितीही अशीच झाली आहे. सिनेमात खूप काही असलं तरीही मसाला आवडतो म्हणून भरमसाट भरणा केल्यावर सगळंच मुसळ केरात जातं तशी निराशा हा सिनेमा करतो.
या सिनेमात तारुण्य आहे, प्रेम आहे, वेधक दृश्ये आहेत. या सगळय़ाच्या जोडीला उत्तम लोकेशन आहे. शिवाय बदला, हाणामारी, सस्पेन्स हे सगळं आहे, पण या सगळय़ाला जोडून ठेवणारी सहजता मात्र नाहीय. गोव्याच्या निसर्गरम्य भूमीवर एक प्रेमकथा फुलते. पण अचानक फासे उलटे होतात आणि सगळं होत्याचं नव्हतं होऊन जातं. मग सुरू होतं खुनाचं सत्र. मग डिपार्टमेंटचे दोन पोलीस या खुनाच्या मागे लागतात. मुळात हे खून का होत असतात? या खुनामागे काय असतं आणि काय होतं हे सांगणारा ‘मलंग’ हा सिनेमा. वरकरणी पाहता या सिनेमात जे घडतं ते वाचून नक्कीच उत्सुकता चाळवते. पण मुळात ते सगळं इतकं उग्र आणि एकात एक, त्यात दुसरं, त्यात तिसरं असं गुंतले गेले आहे की प्रेक्षक म्हणून आपल्याला जे अपेक्षित असतं त्यातला रस आपोआपच कमी व्हायला लागतो.
यात आदित्य राय कपूर याचा अभिनय खूप सुंदर झाला आहे. त्याने पिळदार शरीरयष्टीसाठी घेतलेली मेहनत आणि त्याला दिलेली अभिनयाची सणसणीत जोड नक्कीच कौतुकास्पद आहे. दिशा पटनी अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसली आहे. या दोन्ही तरुण आणि ताज्या जोडीमुळे सिनेमा फ्रेश वाटतो हे नक्कीच. पण अर्थात अभिनय साकारणं आणि संवाद नीट बोलता येणं यात मात्र दिशा थोडी दिशाहीन होते. अनिल कपूर एकदम जबरदस्त. कुठच्याही सिनेमात, कुठच्याही भूमिकेत अनिल कपूर फक्कडच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होतं. कुणाल खेमूने देखील चांगल्या अभिनयाची जोड दिली आहे. एकूणच कलाकारांच्या बाबतीत सिनेमाला उत्तम गुण मिळत असले तरीही संहितेच्या पातळीवर हा सिनेमा दुबळा पडतो. तसंच दिग्दर्शक मोहित सुरीचे सिनेमे पाहता त्याचा आजवरचा सस्पेन्स, थ्रिलर हा प्रकार उत्तम हाताळला गेला असल्याचं लक्षात येतं. त्यामुळेच हा सिनेमा त्या सगळय़ापुढे उठाव धरत नाही हे अधिक प्रकर्षाने जाणवतं. यात कलाकार चांगले आहेत. मसाला आहे, पण हे सगळं नीट वापरता आलं असतं तर एकूणच सिनेमा खमंग झाला असता हे नक्कीच. पण पहिल्या अर्ध्या भागात फुलवायचा प्रयत्न दुसऱया भागात फारच वरवरचा वाटतो.
गाणी फार लक्षात राहणारी नसली तरीही श्रवणीय आहेत. गोव्याचे लोकेशन आणि त्या पार्श्वभूमीवर ही जोडी खूपच छान वाटते. पण एवढं सगळं असलं तरीही आवर्जून थेटरमध्ये जाऊन सिनेमा पाहावा असं मात्र या सिनेमाच्या बाबतीत वाटत नाही.
सिनेमा – मलंग
दर्जा – अडीच स्टार
निर्माता – भूषण कुमार, किशन कुमार, लव रंजन, अंकुर गर्ग, जय शेवक्रमाने
दिग्दर्शक- मोहित सुरी
लेखक – असीम अरोरा
कलाकार – आदित्य रॉय कपूर, दिशा पटनी, अनिल कपूर, कुणाल खेमू




























































