रेल्वे स्टेशनच्या छतावर मलेरियाचा दबा; दादर, माहीम, माटुंगा, शीव स्थानकात 21 ठिकाणी सापडल्या अळय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना पूर्ण आटोक्यात येत असताना पावसाळी आजार मात्र डोके वर काढत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे प्रचंड गर्दीच्या दादर स्थानकासह माहीम, माटुंगा आणि शीव स्थानकाच्या छपरावरील पन्हाळींमध्ये तब्बल 21 ठिकाणी मलेरियाच्या ऍनोफिलीस डासाच्या अळय़ा सापडल्या आहेत. त्यामुळे पालिकेने संबंधित ठिकाणी डास प्रतिबंधक फवारणी आणि डासांची ठिकाणे नष्ट करण्यास सुरुवात केल्याचे जी/उत्तरचे सहायक आयुक्त प्रशांत सकपाळे यांनी सांगितले.

जुलैच्या सुरुवातीपासून मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे पाणी साचून पावसाळी आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या जी/उत्तर विभागाकडून संपूर्ण  विभागात डास निर्मूलनासाठी औषध फवारणी, धूम्रफवारणी करण्यात येत आहे. विशेषतः मलेरिया, डेंग्यू आजारांच्या नियंत्रणासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, टेरेसवर टाकलेले अडगळीचे सामान, झोपडपट्टीमधील पाण्याचे ड्रम, प्लॅस्टिक ताडपत्रीमध्ये पावसाचे साचलेले पाणी, भंगार वस्तू, बांधकामे इत्यादींची तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान डास-अळय़ा आढळून आल्यास उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात येतात किंवा कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे.

परिसर स्वच्छ ठेवा

पावसाळी आजार पसरण्यास साचलेले पाणी, अस्वच्छता कारणीभूत ठरते. त्यामुळे रहिवाशांनी आपले घर, ऑफिसचा परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. घरात, कार्यालयात किंवा परिसरात पाणी साचू शकतील अशी ठिकाणे असल्यास ती तत्काळ नष्ट करावीत, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

1 ते 10 जुलै कालावधीतील रुग्ण

  • मलेरिया   129
  • गॅस्ट्रो  176
  • कावीळ     23
  • डेंग्यू   19
  • लेप्टो 05
  • स्वाइन     03