
देशात बेरोजगारी हा अत्यंत ज्वलंत मुद्दा बनला असल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. तसेच वर्षाला दोन कोटी नोकऱया देण्याचा दावा करणाऱया सरकारला या नोकऱया गेल्या कुठे, असा सवाल देशातील तरुण करत आहे, अशा शब्दांत भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. खरगे यांनी ‘एक्स’ अकाऊंटवरून विविध मुद्दय़ांवरून मोदी सरकारला घेरले.
देशातील तरुण सरकारला विचारतोय की, वर्षाला दोन कोटी नोकऱया देण्याच्या सरकारच्या दाव्याचे काय झाले? भरती परीक्षांपासून ते नोकरी मिळेपर्यंतचा प्रवास अत्यंत कठीण बनला असून देशात प्रचंड बेरोजगारी वाढल्याचे खरगे यांनी म्हटले आहे. बेरोजगारीबद्दल सांगताना खरगे यांनी जुलै 2022 ते जून 2023 दरम्यानच्या एका अहवालाचा हवाला दिला आहे. देशभरात 15 ते 29 वयोगटातील तरुणांचा बेरोजगारी दर 10 टक्के असल्याचे अहवालात म्हटल्याकडे खरगे यांनी लक्ष वेधले आहे.



























































