भाजपच्या नेत्यांनीच तेव्हा मुस्लीम लीगसोबत सरकार बनवलं होतं, मल्लिकार्जून खरगे यांची जोरदार टीका

भाजपच्या नेत्यांनीच तेव्हा मुस्लीम लीगसोबत सरकार बनवलं होतं, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली. तसेच जे कालपर्यंत वंदे मातरम् म्हणत नव्हते तेच आज जोर-जोरात घोषणा देत आहेत असेही खरगे म्हणाले.

संदसेद मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, “जे कालपर्यंत वंदे मातरम् म्हणत नव्हते तेच आज जोर-जोरात घोषणा करत आहेत. तेच लोक आज संवेदनशील झालेत.” खरगे यांनी सभागृहात थेट वंदे मातरम् अशी घोषणा दिली. खरगे पुढे म्हणाले, “भाजप देशभक्तीचे धडे देत आहे. पण हे तेच लोक आहेत ज्यांनी मुस्लिम लीगसोबत सरकार बनवली होती. त्या वेळी त्यांची देशभक्ती कुठे होती?” त्यांनी सांगितले की ते 60 वर्षांपासून वंदे मातरम् गात आहेत, आणि जे आज घोषणा देत आहेत त्यांनी हे नुकतेच सुरू केले आहे. काँग्रेसच्या वतीने त्यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना अभिवादनही केले.

या चर्चेवर आणखी बोलताना खरगे म्हणाले की, “देश आर्थिक संकट आणि बेरोजगारीच्या गंभीर स्थितीतून जात आहे. अशावेळी सरकार लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असे मुद्दे पुढे आणत आहे.” त्यांचा आरोप होता की बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा मुद्दाम पुढे आणला गेला आहे. “आज डॉलर 90 रुपयांवर गेले आहे, लोकांच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी. हे सगळं म्हणजे मूळ मुद्द्यापासून पळवाट काढण्याचा प्रयत्न,” असे त्यांनी स्पष्ट केले.

खरगे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. “पंतप्रधानांनी 1937 मध्ये नेहरूंनी वंदे मातरम् च्या काही ओळी काढल्या असा आरोप केला आहे. पण मुस्लिम लीगसोबत बंगालमध्ये सरकार बनवत होते तेव्हा काय झाले होते? श्यामा प्रसाद मुखर्जी सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा तुमची देशभक्ती कुठे होती?” असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.

चीन आणि पाकिस्तान संबंधांवरही खरगे बोलले. “दशकांनंतर अशी वेळ आली आहे की बांगलादेश पाकिस्तानकडे झुकत आहे, चीन अरुणाचल प्रदेश आपला असल्याचा दावा करत आहे, आणि एका भारतीय महिलेला शांघायमध्ये 18 तास बसवून ठेवले. तरीही चीनविरुद्ध सरकार एक शब्द बोलत नाही,” अशी टीका त्यांनी केली. या चर्चेमुळे राज्यसभेचे वातावरण तापले असून पुढील अधिवेशनातही या विषयावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे.