पंतप्रधान मोदी यांनी जनतेचे पैसे आपल्या मित्राला दिले; मल्लिकार्जुन खरगे यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना मदत केल्याचा आणि सत्तेत आल्यापासून खऱ्या मुद्द्यांवर न बोलून लोकशाही नष्ट केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यात एका सभेमध्ये ते बोलत होते. खरगे म्हणाले, 2019 मध्ये गौतम अदानींची मालमत्ता 1 लाख कोटी रुपये होती. अडीच वर्षांत त्यांची संपत्ती 13 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली. हे तेच अदानी होते, ज्यांच्या फ्लाइटने मोदी शपथ घेण्यासाठी आले होते. अशी कोणती जादूची कांडी आहे, ज्याने अदानींची संपत्ती एवढी वाढली, पंतप्रधान मोदींनी जनतेच्या पैशातून आपल्या मित्राला निधी दिल्याने हे घडले, असा आरोपही खरगे यांनी केला.

मी मोदीजींना विनंती करेन की, देशातील गरीब, शेतकरी आणि मजुरांना ही कला शिकवावी. मग तुम्हाला इतके कष्ट करावे लागणार नाहीत. तुम्ही अदानींना 13 लाख कोटी रुपयांची मदत केली, देशातील लोकांना किमान 13 लाखांची मदत करा, असेही ते म्हणाले. यावेळी भाजप सरकार लोकशाही नष्ट करत असल्याचा आरोप करत खरगे म्हणाले की, माझ्या सभागृहातील भाषणासोबतच राहुल गांधींच्या भाषणाचा काही भागही हटवण्यात आला. काँग्रेस पक्षाने खरे मुद्दे मांडण्याचे काम केले. माझी कविताही काढली. त्यात असंसदीय काय होतं, असा सवालही त्यांनी केला. मोदीजींनी काही कविताही वाचल्या होत्या, पण त्या काढल्या नाहीत,’ असेही खरगे यांनी सांगितले.