मोठी बातमी: मल्लिकार्जुन खरगे लोकसभा लढवणार नाहीत? सूत्रांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पक्षात अस्वस्थता आहे.

रणांगणात सेनापतीच नाही असं होऊ शकत नाही अशी भावना व्यक्त केली जात आहे आणि त्यांनीच आघाडीचं नेतृत्व केलं असं त्यांच्या पक्षातील नेत्यांना वाटत आहे. पक्षातील दिग्गजांकडून एक महत्त्वपूर्ण पैलू निदर्शनास आणला असून अध्यक्षाने स्वतःच्या वैयक्तिक प्रचारात न अडकता व्यापक हित लक्षात घेतलं पाहिजे असं मत व्यक्त करण्याता आलं आहे.

गेल्या आठवड्यात गुलबर्गा मतदारसंघासाठी कर्नाटकच्या उमेदवारांच्या यादीत खरगे हे एकमेव नाव होतं. पण राधाकृष्णन दोड्डामणी यांना तिथून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. राधाकृष्णन हे खरगे यांचे जावई असल्याचं एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटलं आहे. सूत्रांच्या हवाल्यानं संबंधित वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

खरगे गुलबर्गा मतदारसंघातून दोनदा विजयी झाले होते परंतु 2019 मध्ये ते पराभूत झाले. तेव्हापासून ते राज्यसभेत आहेत, जिथे ते विरोधी पक्षनेते आहेत. त्यांची वरिष्ठ सभागृहात आणखी चार वर्षे शिल्लक आहेत.

खरगे यांचे सुपुत्र प्रियांक खर्गे हे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. ते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे वृत्त आहे.

खरगे म्हणाले आहेत की त्यांना ‘एका मतदारसंघापुरते मर्यादित राहायचे नाही तर देशभरात लक्ष केंद्रित करायचे आहे’.

पक्षाध्यक्षांनी निवडणूक न लढवल्याची कोणतीही नोंद काँग्रेसकडे नाही. अलिकडच्या वर्षांत, सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांनीही निवडणूक लढवली आणि जिंकली, तरी 2019 मध्ये गांधींनी स्मृती इराणी यांच्याकडून पक्षाचा बालेकिल्ला गमावला.

भाजपमध्येही, जेपी नड्डा यंदा निवडणूक लढवणार नाहीत. मात्र 2014 आणि 2019 मध्ये, तत्कालीन भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनी लखनौ आणि गांधीनगरमधून प्रचंड विजय मिळवला होता.

INDIA आघाडीच्या शेवटच्या बैठकीत, खरगे यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधी गटाचा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केले होते. पण निवडणूक संपल्यावर या विषयावर चर्चा व्हायला हवी असे म्हणत खरगे यांनी नकार दिला होता.