
पेटीतले सडके आंबे बाजूला करा नाहीतर आंब्याची सगळी पेटी खराब होईल, काँग्रेसनेही पक्षासोबत नेमके हेच केले पाहिजे, असे विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
जुनागढ जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अहवालाकडे बोट दाखवून ते म्हणाले यात सांगण्यात आले आहे की, पक्षाच्या 41 पैकी 19 शहर आणि जिह्याच्या ठिकाणी आपली पिछेहाट होत आहे, असे त्यांनी नमूद केले.
गुजरातमध्ये ताकद वाढवायची आहे
गुजरातमध्ये जे काँग्रेस नेते तडजोडी करतात, ज्यांना चांगली कामगिरी करता येत नाही अशा लोकांना वेळीच बाजूला करा, तुम्ही स्वतःमध्ये बदल करा, पक्ष आपोआप चांगल्या पद्धतीने उभा राहील. गुजरातमध्ये काँग्रेसला आपली ताकद वाढवायची आहे, असेही खरगे म्हणाले.