पंतप्रधान जेव्हा संसदेत येतात तेव्हा त्याचा इव्हेंट करतात, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या विशेष अधिवेशनाची सुरुवात गोंधळाने झाली. तांत्रिक चूक दाखवत विरोधकांनी गदारोळ केला. त्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात विरोधकांना चर्चा हवी होती मात्र त्याला उपसभापतींनी संमती दिली नाही. त्यावरून मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर निशाणा साधला.

राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत बोलताना नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ”पंडित नेहरु जेव्हा देशाचे पंतप्रधान होते, त्यावेळी ते नेहमी म्हणायचे की जर तुमचे विरोधक हे प्रबळ नसतील तर तुमच्या सिस्टिममध्ये काहीतरी कमतरता राहिल्या आहेत. सध्याची अवस्था अशी नाही. विरोधी पक्ष मजबूत स्थितीत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांना कमकुवत केलं जातं आहे. आरोप करायचे, त्रास द्यायचा, मग त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं, वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं आणि मग पक्षात स्वागत करायचं. हेच चाललं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत खूप कमीवेळा येतात आणि जेव्हा येतात तेव्हा त्याचा इव्हेंट करतात” अशी टीका खरगे यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळ्या ठिकाणी जात आहेत, भेटी देत आहेत मात्र मणिपूरला जायला त्यांना वेळ नाही, अशीही टीका त्यांनी यावेळी केली आहे.