
नीता ताटके,मलखांब प्रशिक्षिका,neetatatke @gmail.com
ताकद… लवचिकता… प्रमाणबद्ध शरीर… उत्तम मानसिकता ज्या खेळातून मिळते तो खेळप्रकार म्हणजे अस्सल मराठमोळा मलखांब… दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या या खेळाने आज विश्वचषकापर्यंतची मजल मारली आहे. आजपासून दादर, शिवाजी पार्क येथे सुरू होणाऱया विश्वचषक मलखांब स्पर्धेत जगभरातून 15 देश सहभागी होणार आहेत…
मलखांब या खेळाची आम्ही परदेशात खूप प्रात्यक्षिके दाखवली. पण आम्हाला फक्त प्रात्यक्षिके दाखवायची नाहीत. त्यातून त्या खेळाचा प्रसार करायचा होता. 2004 साली जर्मनीमध्ये पहिल्यांदा आम्ही मलखांब शिबीर घेतले. तिथला प्रतिसाद पाहता तेव्हापासून दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आम्ही तिथे शिकवायला जातो. तिकडचे विद्यार्थी येथे येऊन प्रशिक्षण घेतात. मग हे लोण हळहळू अमेरिकेत गेलं, थोडं इंग्लंडमध्ये गेलं, सिंगापूरमध्ये गेलं. असं करता करता मलखांब परदेशात पोहोचला. हिंदुस्थानबाहेर उदय देशपांडे यांनी सुमारे तीस ते पस्तीस देशांमध्ये जाऊन मलखांब शिकवला. या सगळ्या आपल्या आंतरराष्ट्रीय प्रचार, प्रसारात असं कुठेतरी वाटायला लागले की मलखांबप्रेमींना एकत्र आणायला पाहिजे. आणि त्याच्यामधून ही मलखांब स्पर्धेची कल्पना सुचली.

उदय देशपांडे सर जर्मनीत सगळ्या विद्यार्थ्यांच्या समुहामध्ये असताना त्यांनी सहज विश्व मलखांब स्पर्धेची कल्पना मांडली. लगेच तिथल्या सगळ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत आमची टीम येणार असे जाहीरही करून टाकले. लगेच पालकही म्हणाले की चिअरअप करायला आम्ही आलो तरी चालेल का इतकी उत्सुकता या खेळाविषयी तिथे होती. त्यांचा उत्साह पाहून वाटलं की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यानंतर परदेशात आंतरराष्ट्रीय स्पर्धा केव्हा होतात त्याची माहिती घेतली. आंतरराष्ट्रीय कॅलेंडर पाहिल्यावर फेब्रुवारी, मार्च हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा होण्याचा काळ असतो. त्यानुसार मग फेब्रुवारी 16 आणि 17 या तारखा निश्चित करण्यात आले.
मलखांब ऑलिम्पिकपर्यंत पोहोचावा
मलखांबाचा प्रसार हा स्पर्धात्मक व्हायला हवा. सध्या तो राष्ट्रीय पातळीवर आहे, पण तो आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावा अशी आमची इच्छा आहे. बाकीच्या देशांचे खेळ कसे ऑलिम्पिकपर्यंत मजल दरमजल करत फिरले आहेत. ते एक स्वरूप मलखांबालाही मिळावे असे आम्हाला वाटते. हा हिंदुस्थानी खेळ मलखांबाचा ऑलिम्पिकपर्यंत पोहोचावा यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.
दुसरा विश्व मलखांब अमेरीकेत
यंदा परदेशातून येणाऱया स्पर्धकांची सगळी व्यवस्था समर्थ व्यायामशाळा करणार आहे. सांघिक अजिंक्यपद स्पर्धा, वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धा, इव्हेण्ट अजिंक्यपद स्पर्धा, याच्याबरोबर सांघिक सादरीकरण अशा चार प्रकारात स्पर्धा होणार आहेत. त्याचबरोबर हिंदुस्थानानंतर 2021 ला दुसरा विश्व मलखांब अमेरिकेमध्ये होणार आहे. अमेरिकेच्या मलखांब संघटनेने दुसऱया विश्व मलखांब स्पर्धेचे आयोजन करण्याचे मान्य केले आहे..
मलखांबाचे फायदे
शरीरयष्टी पिळदार आणि स्नायू बळकट होतात. पाठीच्या कण्याला उत्तम व्यायाम मिळतो. मलखांब करताना खेळाडूला एरंडेल तेल लावतात, त्याने पूर्ण शरीराला मसाज मिळतो आणि स्नायू बळकट होतात. शरीराच्या सर्व इंद्रियांच्या क्रिया सुधारतात. स्नायूंवर ताण पडून ते मजबूत होतात. मलखांबावर जलद गतीने उडय़ा मारल्याने दम उत्तम वाढतो. रक्ताभिसरण उत्तम राहणे, मनाची एकाग्रता ध्यान वाढते, मांसपेशीय शक्ती वाढते. शरीराची संतुलित वाढ होते, रुक्षता जाऊन स्निग्धता येते.
























































