खेळालाच आपली संरक्षण ढाल बनवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दत्ताराम दुदम

कोरोनाच्या महामारीने अवघ्या जगाला वेठीस धरलंय. या विषाणूने जगातले कुठलंही क्षेत्र सुरक्षित ठेवलेलं नाहीये. मग क्रीडाक्षेत्र त्याला अपवाद कसं असेल? गेले चार महिने कुठल्या स्पर्धा नाहीत की प्रत्यक्ष खेळाचा सराव नाही. त्यामुळं खेळाडू देखील हताश आहेत. जगापुढे अस्तित्व टिकवण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. हिंदुस्थानी जनता मात्र कोरोनाशी मोठ्या धैर्याने लढतेय. याचं कारण म्हणजे आपली वैभवशाली संस्कृती आणि परंपरा. हिंदुस्थानी संस्कृतीतील व्यायामप्रकार, आसन आणि योगप्रकारांनी आपल्याला संकटाशी जिद्दीने लढण्याचं बळ दिलंय. आपली सकस आणि सात्विक आहारपद्धतीही याकाळात फायदेशीर ठरतेय.

कोणत्याही संकटाशी लढण्याची प्रेरणा आपल्या खेळामुळेच मिळते असं क्रीडापटू म्हणून माझं ठाम मत आहे. सध्याच्या काळात सर्वात महत्त्वाचं आहे ते रोग प्रतिकारशक्ती वाढवणं. मैदानी खेळासाठी आवश्यक असलेल्या व्यायाम प्रकारांनी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढकणं सहज शक्य होते. मी देखील लॉकडाऊनच्या काळात व्यायाम,योगा आणि सात्विक आहारावर भर दिला. तुम्हीही तुमच्या आवडत्या खेळाला शरीराची संरक्षक ढाल बनका. कोणताही खेळ असो त्यासाठी शरीरसंपदा उत्तम राखावीच लागते. त्यामुळे क्रीडापटूंना कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार देशात फारचं कमी पाहायला मिळतात. म्हणून युवकांनी आपल्या आवडत्या मैदानी खेळाकडे कळावं असं माझं आवाहन आहे.

सामाजिक भान ठेवून खेळाडूंनी या संकटात अडकलेल्यांना मदतीचा हात द्यायला हवा. कोरोनाचं संकट ही आपली सत्वपरीक्षाच आहे. संकट हे माणसाला संघर्ष करायला शिकवते. कोरोनाने आपल्याला या घडीला सतत  संघर्ष  करा  आणि  आपल्या चुका  टाळून पुढे जा, हा संदेश दिलाय. या संकटाने खचू नका. उद्याचा दिवस आपल्या प्रगतीचा आणि आनंदाचा असेल यात शंका नाही.

घाबरून मैदान सोडू नका!

वयाच्या बाराव्या वर्षांपासून मी मल्लखांब या खेळात आपलं करिअर बनवलं. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गुरु उदय देशपांडेसरांचा हात पाठीशी असल्यानं मला मोठी मजल मारता आली. मल्लखांबामुळे माझं मन खंबीर आणि स्वभाक लढाऊ झाला. आपल्यावर कोरोनारूपी महासंकट आलंय हे खरं असलं तरी त्याला घाबरून मैदान सोडणं ही आपली संस्कृती नाही. कोरोनापासून आपली सूटका करण्यासाठी आपले केंद्र आणि राज्य सरकार,  डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र मेहनत घेतायत. त्यामुळे अन्य देशांपेक्षा आपल्याकडे  कोरोनावर चांगले नियंत्रण मिळवलंय.

ऑनलाईन स्पर्धांनी दिला आधार!

लॉकडाऊनमुळे खेळ आणि त्याचा सराव होत नसल्याने खेळाडूंना काहीशी मरगळ आली होती. अखेर मुंबई उपनगर आणि राज्य स्तरावर मल्लखांबाच्या ऑनलाईन स्पर्धा आणि परिसंवाद आम्ही आयोजित केल्या. त्यात 200 जिम्नॅस्टर्सनी सहभाग घेतला. 21 जूनला राष्ट्रीय मल्लखांब दिनाच्या निमित्ताने राज्य मल्लखांब संघटनेने ऑनलाईन मल्लखांब शिबीर आयोजित केले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या निराशेतून या शिबीराने खेळाडूंना बाहेर काढता आलं याचं प्रशिक्षक म्हणून मला समाधान आहे.

(लेखक सहा वेळचे राष्ट्रीय मल्लखांब पुरस्कार विजेते आहेत.)