आचरा परिसरातील वीज समस्या तात्काळ सोडवा- आमदार वैभव नाईक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मालवण

आचरा भागातील वीज समस्यांबाबत आमदार वैभव नाईक यांनी आचरा वीज उपकेंद्राला भेट दिली. यावेळी वीज समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कार्यकारी अभियंता संजय गवळी व अधिकारी सिंग यांच्याशी चर्चा करून त्यांनी वीज समस्यांच्या व उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी पंचायत समिती सदस्य निधी मुणगेकर, विभाग प्रमुख उदय दुखंडे, उपसरपंच अनिल गावकर, भाऊ परब, नारायण कुबल, समीर लब्दे, ग्रा. पं . सदस्या अनुष्का गावकर, सदानंद घाडी, श्याम घाडी , राजन गावकर, मुजावर, रुपेश घाडी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी विजेच्या विविध समस्या ग्रामस्थांनी मांडल्या. या समस्याचे तातडीने निवारण करण्याबाबतच्या सुचना तसेच गणेश चतुर्थी सण जवळ येत असल्याने वीज पुरवठा सुरळीत रहावा यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी गवळी यांना केल्या. आचरा भागात विद्युत लाईन व पोल नूतनीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यावेळी आमदार नाईक यांनी केल्या.

समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे आचरा येथील मुख्य विद्युत वाहिनी जीर्ण झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. ग्रामस्थांच्या मागणी वरून हि लाईन बदलण्यात यावी. तसेच ज्याठिकाणी पोल जीर्ण झाले आहेत ते बदलावेत. आवश्यक ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर बसवावेत, लाईन शिफ्टिंग, लाईन कन्व्हर्जनची कामे मार्गी लावावीत, मेन लाईनवर ट्रीपर बसवावेत अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी यावेळी अधिकाऱयांना केल्या.

वायंगणी कालावल सडयेवाडी येथे सिंगलफेज लाईन थ्रीफेज करण्याच्या मागणी ग्रामस्थांनी केली, ती मान्य करण्यात आली. आचरा हिर्लेवाडी, खोतवाडी या भागात शेतीच्या मळ्यातून विद्युत वाहिन्या गेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱयांना त्याचा त्रास होत आहे. ते पोल रस्त्याचा बाजूने शिफ्ट करावेत अशी मागणी पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर यांनी केली.