‘जय भराडी’च्या जयघोषाने आंगणेवाडी दुमदुमली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

‘जय जय भराडी देवी’च्या जयघोषात सोमवारी आंगणेवाडी नगरी भक्तिसागरात न्हाऊन निघाली. यात्रोत्सवाच्या निमित्ताने आंगणेवाडीत विक्रमी संख्येने लाखो भाविकांचा जनसागर उसळला. आज पहाटे तीनपासून भाविकांनी दर्शनास सुरुवात केली. तरीही आज रात्री उशिरापर्यंत भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

devi-f

यात्रोत्सवात नेतेमंडळी व सेलिब्रेटींनी हजेरी लावली. आंगणेवाडी मंडळ आणि प्रशासन यांच्याकडून भाविकांच्या सुलभ दर्शनसाठी स्वतंत्र नऊ रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱयाच्या माध्यमातून यात्रोत्सवावर लक्ष ठेवले जात होते.
आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या आरासने मंदिर परिसर झळाळून गेला. शेकडो दुकानांच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाली. मंगळवारी मोडयात्रेने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

नवसाला पावणारी अशी ख्याती राज्याच्या कानाकोपऱयात पोहचलेल्या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रोत्सवात लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, वित्त व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, आमदार वैभव नाईक, आमदार आशीष शेलार, अरुण दुधवडकर, मुंबई, ठाणे तसेच परिसरातील नगरसेवक पदाधिकारी यांसह शिवसेना, भाजप, स्वाभिमान, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे या व अन्य पक्षांचे पदाधिकारी व अन्य व्हीआयपींनी दर्शन घेतले.

कोटय़वधीची उलाढाल

आंगणेवाडी यात्रेत विविध प्रकारची दुकाने सजली होती. सर्वाधिक मागणी मालवणी खाजाला होती. तसेच मिठाई दुकाने, हॉटेल, कपडे, अवजारे अन्य प्रकारच्या सर्व गृहपयोगी वस्तू, खेळणी यांनी सजलेल्या दुकानात मोठी गर्दी होती. काही वस्तू तर या आंगणेवाडीतच खरेदी करायच्या असतात. असेही खरेदीदार, हौशे-नौशे-गौशे यांच्या माध्यमातून सांगितले जात होते.

जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. दिवसभरात सुमारे 80 हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी या केंद्रास भेट देऊन संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आणि कार्यकर्त्यांनी राबविलेल्या सेवा कार्याचे कौतुक केले. जिल्हाप्रमुख आणि आमदार वैभव नाईक, आमदार सुनील शिंदे, मंगेश कुडाळकर, माजी महापौर दत्ता दळवी यांच्यासह मुंबईतील सर्व उपस्थित नगरसेवकांनी केंद्रास सदिच्छा भेट दिली. प्राथमिक उपचार तसेच सहाय्यता सेवादेखील भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.