मालवण शहरातील रखडलेल्या कामांबाबत आमदार वैभव नाईक यांची नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण शहरात रखडलेली गटार खोदाई, तसेच शहरातील कचरा प्रश्नी शिवसेना पदाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार वैभव नाईक यांच्या समोर पालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला.

दरम्यान, गटार खोदाई करणाऱ्या ठेकेदाराला कामगार मिळत नसल्याचे पालिका अधिकारी यांनी सांगताच आमदार नाईक यांनी ‘मी लमाणी कामगार उपलब्ध करून देऊ का’? असे सांगत कामगार उपलब्ध करणे ही काम घेतलेल्या ठेकेदाराची जबाबदारी आहे. कारणे नको काम वेळेत पूर्ण करून घ्या. कचरा समस्याही सुटण्यासाठी नियोजन करा. अश्या सूचना आमदार वैभव नाईक पालिका प्रशासनास दिल्या आहेत.

आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी मालवण पालिका कामांचा आढावा मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्याकडून घेतला. यावेळी पालिका अधिकारी यासह उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, उपशहर प्रमुख किसन मांजरेकर, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, यशवंत गावकर, संमेश परब, पंकज सादये, महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, सिद्धार्थ जाधव, नरेश हुले, प्रसाद आडवणकर यासह अन्य उपस्थित होते.

पावसाळा आला तरी गटार खोदकाम पूर्ण न झाल्याने तसेच ज्या ठिकाणी गटार खोदाई झाली ते कामही योग्य न झालेबाबत शिवसेना पदाधिकारी यांनी समस्यांचा पाढा वाचला. यावेळी मुख्याधिकारी यांनी सांगितले, टेंडर दोन वेळा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. आता सिंधुदुर्ग बाहेरील ज्या ठेकेदार एजन्सीने टेंडर घेतले आहे त्याला गटार खोदाईस कामगार मिळत नसल्याचे पालिका अधिकारी यांनी सांगितले. यावर शिवसेना पदाधिकारी म्हणाले, कामगार नाहीत हा ठेकेदार याचा प्रश्न आहे. काम वेळेत व योग्य पद्धतीने झाले पाहिजे. अशी भूमिका उपस्थितानी मांडली.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले गतवर्षी गटार खोदाई वेळेत पूर्ण व्हावी यासाठी नगरसेवक यतीन खोत यांनी सहकार्य केले. कोरोना काळ असताना ठेकेदारास कामगार उपलब्द केले. मात्र यतीन खोत यांचे काम म्हणून नाहक चर्चा झाली. सहकार्य केले म्हणून बदनामी होणार असेल तर कोण सहकार्य करण्यास पुढे येणार नाही याचा विचार झाला पाहिजे.

आता ठेकेदारास कामगार मिळत नाहीत तर मी लमाणी कामगार उपलब्ध करून देऊ का ? असा सवाल उपस्थित करत पालिका प्रशासनाने लवकरात लवकर गटार खोदकाम पूर्ण करून घ्यावी अश्या सूचना केल्या. तसेच कचरा समस्येतूनही शहर वासीयांची मुक्तता व्हावी यासाठी प्रशासनाने नियोजन करावे असेही आमदार नाईक यांनी सांगितले.

कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांचे बिल मागे ठेवा

मालवण शहरात वायरी गर्देरोड रस्ता काम संबंधित ठेकेदाराने पूर्ण केले नाही. अन्य काही कामेही एका ठेकेदाराने पूर्ण केली नाहीत. याबाबत तपस्वी मयेकर, मंदार केणी यांनी तक्रार मांडली. यावर आमदार नाईक यांनी सांगितले, कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदार यांची बिले पालिका प्रशासनाने मागे ठेवावीत. एकूणच शहरातील विविध समस्या बाबत यावेळी चर्चा झाली.