मालवणातून कर्नाटक राज्यातील फरार आरोपी वनविभागाच्या ताब्यात

कर्नाटक राज्यातील वनविभागाच्या वेगवगेळ्या गुन्ह्यात “हिटलिस्टवर असणाऱ्या कमलाकर नाईक (रा. शिराली ता भटकळ जि. उत्तर कर्नाटक) या फरार सराईत आरोपीला वनपरिक्षेत्र कुडाळ व कर्नाटकातील वनपरिक्षेत्र मानकी च्या टीमने संयुक्त कारवाई करत मौजे कातवड ता मालवण येथून ताब्यात घेतले.

शासकीय जंगलातील मौल्यवान साग वृक्षांची अवैधरित्या तोड केल्याने त्याचेवर भारतीय वन अधिनियम 1927 च्या विविध कलमान्वये तसेच अनुसूची 3 मधील वन्यप्राणी सांबराच्या शिकारीसाठी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमान्वये सदर आरोपीवर गुन्हे दाखल आहेत. मागील दोन दिवसापासून आरोपी आपली लोकेशन बदलून हुलकावणी देत होता अखेर त्याला ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले.

सदर कारवाई उपवनसंरक्षक सावंतवाडी एस. एन. रेड्डी व उपवनसंरक्षक रवीशंकर सी. होनावर कर्नाटक राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र मानकी सविता देवाडिगा, वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट, वनपाल मठ सावळा कांबळे, महेश पाटील, दत्तगुरु पिळनकर, उप वनपरिक्षेत्र अधिकारी मानकी संदीप आरकसाली, योगेश मोगेर व ईश्वर नाईक यांनी यशस्वी केली.