मालवण : रस्त्याने जात असताना तरुणावर झाड कोसळले, शिवसैनिकांनी दिला मदतीचा हात

755

मालवण शहरात मंगळवारी दिवसभर जोरदार वारे वाहत होते. शहरातील वाघ पिंपळ मार्गावर एक वाळलेले झाड युवकाच्या अंगावर कोसळल्याने तो जखमी झाल्याची घटना 4 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या जखमी युवकाला शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, किरण वाळके, बाळू नाटेकर व अन्य नागरिकांनी मदत करत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर या तरुणाला पुढील उपचारांसाठी कुडाळ येथे हलवण्यात आले आहे.

कुंभारमाठ येथील विवेक रवींद्र साळगावकर (वय 21) हा युवक कामानिमित्त शहरात आला होता. वाघ पिंपळ मार्गावरून जात असताना एक वाळलेले झाड विवेक याच्या अंगावर कोसळले. यात त्याच्या नाकाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या विवेक याला नागरिकांनी बाजूला आणले. परिसरात राहणाऱ्या बाबी जोगी, किरण वाळके, बाळू नाटेकर व नागरिकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात हलवले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी प्राथमिक उपचार करून तत्काळ सिटीस्कॅन करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार विवेक याला कुडाळ येथे हलवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या