शिवसेनेची बीएसएनएल कार्यालयावर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

मालवण तालुक्यातील बीएसएनएल दूरध्वनी, मोबाईल व ब्रॉडबॅण्ड सेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे. याबाबत शिवसेना पदाधिकार्‍यांनी गुरुवारी बीएसएनएल कार्यालयावर धडक देत अधिकार्‍यांना जाब विचारला. दरम्यान खंडित सेवेची तक्रार कार्यालयात केली असता अधिकार्‍यांनी खासगी कंपनीचे राऊटर वापरा असे सांगितले. संतप्त शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेत “तुम्ही खासगी कंपनीचे दलाल आहात का”? असा प्रश्‍न उपस्थित करत येत्या दोन दिवसात सुरळीत सेवा न झाल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा पदाधिकार्‍यांनी दिला.

तालुक्यातील बीएसएनएल सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. मोबाईल मनोरे आहेत मात्र त्यावरून मिळणारी टूजी, थ्रीजी सेवा पूर्णतः खंडित आहे. गेले बरेच दिवस फोनच लागत नसल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नंदू गवंडी, युवासेना शहर प्रमुख तपस्वी मयेकर, विजय पालव, दत्ता पोईपकर, महेश मेस्त्री, शशांक माने, संतोष राणे, अक्षय भोसले यांच्यासह तालुक्यातील अन्य शिवसेना पदाधिकार्‍यांनी येथील बीएसएनएल अधिकार्‍यांच्या कार्यालयात धडक दिली.

यावेळी आम्ही फोन करत असताना तुम्ही तो का उचलला नाही असे सांगत शिंदे यांनी दूरसंचारचे अधिकारी एस. बी. कसबे यांना चांगलेच सुनावले. ग्राहकांना जर चांगली सुविधा द्यायची नसेल तर तुम्हाला कार्यालयात बसू देणार नाही. असा इशारा त्यांनी दिला. पोईप येथे मोबाईल मनोरा असतानाही त्यावरून रेंज मिळत नसल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. या मनोर्‍यावरून थ्रीजी सुविधा देण्यासाठी आवश्यक साहित्य सावंतवाडी येथे येऊन पडले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात याची कार्यवाही करण्यात यावी असे सांगण्यात आले.

बीएसएनएल कार्यालयात तक्रारी घेण्यासाठी बसविलेले कर्मचारी हे हिंदी भाषिक असून ते ग्राहकांशी उद्धटपणे वागत आहेत. हे उत्तरप्रदेश, बिहार नाही हे लक्षात ठेवत त्यांनी येथे मराठीत बोलायला हवे. ग्राहकांशी कसे वागावे याची सूचना त्यांना करावी अशी मागणी पदाधिकार्‍यांनी केली. त्यानुसार कसबे यांनी त्या कर्मचार्‍याला योग्य ती समज दिली. त्यानंतर कर्मचार्‍याने ग्राहकांची माफी मागितली.