मालवण तालुका देवळी समाज बांधवांचा मेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळाचे जिल्ह्यातील आठही तालुक्यात योग्य प्रकारे कामकाज सुरु आहे. मात्र हा समाज विखुरलेला आहे. विखुरलेल्या देवळी समाज बांधवांनी एकत्र येऊन समाज संघटित केल्यास समाजाला शासन दरबारी न्याय मिळुन उर्जितावस्था येईल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी मालवण येथे बोलताना केले.

मालवण तालुका देवळी समाज शाखेतर्फे समाजातील विद्यार्थी गुणगौरव व वधुवर सुचक मेळावा तसेच ज्येष्ठ नागरिक व समाजातील विविध क्षेत्रावर कार्यरत असलेल्या व्यक्तींचा सत्कार वायरी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळाचे पदाधिकारी रमेश पिंगुळकर, सदानंद तुळसकर, मालवण तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, मारुती आचरेकर, कार्याध्यक्ष सुधाकर पाटकर, देवदास वेरलकर, दत्तात्रय नांदोस्कर, विपुल माळगावकर, सुदेश मालवणकर, विष्णु चौकेकर, उमेश श्रावणकर, मधुसूदन परुळेकर, हनुमंत पाटकर, डॉ. शरदचंद्र काळसेकर, पत्रकार प्रफुल्ल देसाई, अनिल तोंडवळकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रमेश पिंगुळकर म्हणाले, शासन दरबारी नोकरीच्या कामकाजासाठी जातीच्या उल्लेख प्रमाणपत्राची जेव्हा गरज पडते तेव्हाच काही समाज बांधवांना आपला समाज आठवतो. असे न करता प्रत्येकाने आपल्या समाजाप्रती आदर राखुन समाजाला मानसन्मान मिळवून देण्यासाठी योगदान द्यावे. असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्षपदी प्रफुल्ल देसाई यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच पदावर कार्यरत असलेले त्रिंबक सरपंच राजु त्रिंबककर, हिवाळे उपसरपंच काशीनाथ हिवाळेकर, किर्लोस उपसरपंच बाबु किर्लोसकर, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र ओवळीयेकर, विष्णु चौकेकर, मालवण तालुक्यात प्रथम पाच क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या दहावीतील वैभवी देविदास वेरलकर, तसेच बारावीतील विद्यार्थीनी रेखा कांदळगावकर तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य भेट देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती आचरेकर यांनी केले. प्रास्ताविक श्रीकृष्ण तळवडेकर यांनी केले तर आभार देविदास वेरलकर यांनी मानले.