
मालवणच्या प्रसिद्ध चिवला बीच येथील समुद्रात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करणार्या सातारा येथील एका पर्यटकास स्थानिक तरूणांनी वाचविल्याची घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली.
दरम्यान याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित पर्यटक व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार पोलिस ठाणे येथे आलेल्या संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात त्या पर्यटकाला पोलिसांनी स्वाधीन केले.
समुद्रात उडी मारून जीव देणार्या पर्यटकाचा जीव वाचविणार्या स्थानिक तरूणांचा पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार- चिवला बीच येथील समुद्रात सायंकाळच्या वेळेस एका व्यक्तीने समुद्रात उडी मारली. हा प्रकार स्थानिक पर्यटन व्यावसायिक सचिन गोवेकर, महादेव वेंगुर्लेकर, गुरू वेंगुर्लेकर, हेमंत सारंग, दाजी जोगी यांच्या लक्षात येताच त्यांनी समुद्रात धाव घेत त्या पर्यटकाला समुद्रातून बाहेर काढत किनार्यावर आणले.
या प्रकाराची माहिती त्यांनी पोलिस ठाण्यास दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पी. जी. मोरे, सिद्धेश चिपकर, गृहरक्षक दल जवान परशुराम आंगचेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
समुद्रात उडी मारणाऱ्या व्यक्तीची माहिती घेतली असता त्याचे नाव दीपक भीमराव खंडाईत (वय-47, रा. अतित जिल्हा-सातारा) असे समजले. त्यानुसार पोलिसांनी सातारा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून कोरेगाव पोलीस ठाण्यास माहिती दिली. त्यानंतर दीपक खंडाईत ज्या गावात राहतात त्या गावातील व्यक्तींशी संपर्क साधून नातेवाईकांची माहिती घेत त्यांना या घटनेची माहिती दिली.
त्यानुसार खंडाईत यांचा भाऊ तसेच अन्य नातेवाईक मालवण पोलिस ठाण्यात दाखल झाले. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी दीपक खंडाईत यांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले.
चिवला बीच समुद्रात जीव देण्याचा प्रयत्न करणार्या पर्यटकाचा जीव वाचविणार्या स्थानिक तरूणांचा पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक भारत फार्णे, पी. जी. मोरे, सिद्धेश चिपकर आदी उपस्थित होते.































































