मालवण – झाडांसह रस्ताच नदीत कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झाडांसह रस्ताच नदीत कोसळण्याची घटना मालवण तालुक्यातील बांदिवडे ते भगवंतगड मार्गावर घडली आहे. दोन महिन्यापूर्वी खचण्यास प्रारंभ झालेल्या बांदिवडे ते भगवंतगड, आचरा जोडणारा रस्ता भगवंतगड तरी नजीक माड बागायतीसह नदीत कोसळला आहे. त्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.

भगवंतगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला हा मार्ग लालमातीचा आहे. भगवंतगड तसेच बांदिवडे, मसुरे येथील ग्रामस्थ चिंदर-आचरा येथे जाण्यासाठी या पर्यायी मार्गाचा वापर करतात. नदीच्या बाजूने जाणारा हा मार्ग आहे. याठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा संरक्षक कठडा नसल्याने पाण्याच्या सततच्या प्रवाहाने रस्ता साईड पट्टी काही दिवसांपूर्वी खचून रस्ता धोकादायक झाला. त्यात रस्त्याचा काही भागही नदीत कोसळला.

कालावल खाडी पात्रा मध्ये भगवंतगड तरी लगत रस्ता खचल्याने रात्रीच्या वेळी वाहन थेट नदी पात्रात कोसळून जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने याबाबत वर्तमानपत्रातुन तसेच सोशल मीडियातून आवाज उठविण्यात आला होता. सदर मार्गाने मोठी वाहने वगळता चार चाकी व दुचाकी तसेच ग्रामस्थ प्रवास करतात.

आता रस्ता अधिकच कोसळल्याने मार्ग बंदच झाला आहे. चिंदर ग्रामपंचायतच्या वतिने सावधानता फलक लावण्यात आला आहे. एकूणच या संपूर्ण किनाऱ्यावर संरक्षक भिंत अथवा धूप प्रतिबंधक बंधारा उभारणे आवश्यक आहे. चिंदर ग्रामपंचायतच्या वतीने संबंधीत विभागाचे लक्ष वेधण्यात आल्याची माहिती सदस्य समीर लब्दे यांनी दिली आहे. तरी तातडीने दखल घेण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे.