हडी येथे तरुणाची तर वेरली येथे वृद्धाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वृद्ध व तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बेपत्ता असलेल्या वेरली येथील अशोक गणपत परब (वय 55) यांचा मृतदेह जंगलमय भागात गळफास लावलेल्या स्थितीत सापडून आला. तर हडी साळकरवाडी येथील रामचंद्र देऊ भोजने (वय 35) या तरुणाने घरामागील मांगरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेरळ थळकरवाडी येथील दत्ताराम परब हे शुक्रवारी सकाळी गुरे चरावयास माळरानावर गेले होते. त्यानंतर गुरांना पाणी देत असताना त्यांना उंचवळा मळा येथे दुर्गंधी वास आल्याने ते त्या दिशेने गेले असता एक मृतदेह झाडास नॉयलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. त्यांनी जवळ जावून पाहिले असता हा मृतदेह गावातीलच अशोक गणपत परब यांचा असल्याचे दिसून आले. त्यांनी या प्रकाराची माहिती पोलिस पाटील प्रमोद परब यांना दिली. त्यांनी याची माहिती मसुरे पोलिस दूरक्षेत्रास दिली. पोलिस कर्मचारी प्रमोद नाईक, विवेक फरांदे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. अशोक परब हे 9 तारखेपासून बेपत्ता होते. याबाबतची खबर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

हडी येथे तरुणाची आत्महत्या

हडी साळकरवाडी येथील रामचंद्र उर्फ संदीप देऊ भोजने या तरूणाने घरामागील मांगरात ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आले. याबाबतची माहिती किशोर नरे यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली. या बाबत माहिती मिळताच सरपंच महेश मांजरेकर यांच्यासह अन्य स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस कर्मचारी हेमंत पेडणेकर, संतोष गलोले यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. रामचंद्र याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.