
सिंधुदुर्ग जिह्यात पर्यटन व्यवसाय हा प्रमुख व्यवसायांपैकीच एक मानला जाते. कोरोना लॉकडाऊनच्या काळात पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. काही महिन्यांनंतर दिवाळीच्या दरम्यान प्रवासी होडी वाहतूक आणि साहसी जलक्रीडा व्यवसायासाठी सशर्त परवानगी देण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा मालवण किनाऱयावरील पर्यटन बहरले. मालवणच्या किनाऱयावर आता मोठय़ा प्रमाणात पर्यटक येत आहेत़ असे चित्र असताना शुक्रवारी बंदर विभागातील अधिकाऱयांनी किनारपट्टीवरील सर्व जलक्रीडा व प्रवासी होडी वाहतूक तात्काळ बंद करण्याचे आदेश व्यवसायिकांना दिले आहेत़ त्यामुळे या ठिकाणी आल्यावर होडीतून फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर पर्यटकांनो सावधान.
कोरोना लॉकडाऊन काळात अनेक व्यवसाय ठप्प होते. सिंधुदुर्ग जिह्यातील पर्यटन व्यवसायही अनेक महिने ठप्प होता. जिह्याच्या पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मालवण येथील शेकडो पर्यटन व्यवसायिक मोठय़ा आर्थिक संकटात सापडले होते. मात्र कोरोना संक्रमण कमी झाल्याने शासनाने अनलॉक प्रक्रियेत अटी-शर्तींसह अनेक व्यवहार, सेवा सुरू केल्या. अखेर दिवाळीच्या दरम्यान जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रवासी होडी वाहतूक व साहसी जलक्रीडा परवानाधारक व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास सशर्त परवानगी दिली. त्यानंतर पुन्हा एकदा पर्यटन बहरले. आठ महिने ठप्प असलेल्या पर्यटन व्यवसायाची गाडी काहीशी रुळावर येत आहे, असे चित्र असताना बंदर विभागातील अधिकाऱयांनी किनारपट्टीवरील सर्व जलक्रीडा व प्रवासी होडी वाहतूक तात्काळ बंद करण्याचे आदेश शुक्रवारी व्यावसायिकांना दिले आहेत. अचानक निघालेल्या या आदेशामुळे पुन्हा एकदा पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे.
आमच्यावरही कारवाई होऊ शकते
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जलक्रीडा सुरू करताना ज्या मार्गदर्शक सूचना, नियम व अटी शर्तींसह जी बंधने आवश्यक आहेत, त्याबाबत कोणतेही आदेश बंदर विभागाच्या मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त न झाल्याने सुरू असलेल्या जलक्रीडा बंद ठेवण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत, अशी माहिती मालवण बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी दिली. रायगड, अलिबाग येथे जलक्रीडा सुरू ठेवल्याप्रकरणी एका अधिकाऱयाला निलंबित करण्यात आले आहे. या किनारपट्टीवर जलक्रीडा सुरू राहिल्यास आमच्यावरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे येथील सर्व जलक्रीडा बंद करण्याचे आदेश व्यवसायिकांना दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

























































