मोदींनंतर ममता बॅनर्जी यांनी घेतली अमित शहांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी एनआरसीची मुद्दा शहांपुढे मांडला. याआधी ममता यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

शहा यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, शहा यांच्या भेटीदरम्यान एनआरसीबाबत चर्चा झाली. पश्चिम बंगालमधील 19 लाख लोकांची नावे एनआरसी यादीतून गायब आहेत. यातील बरेच लोक हिंदी, बंगाली आणि स्थानिक आसामी भाषा बोलतात. अनेक मतदार या यादीमध्ये नाहीत. याबाबतीत लक्ष घालावे यासाठी शहांना एक लेटरही देण्यात आल्याचे ममतांनी सांगितले. तसेच या संदर्भात शहा यांनी कोणतेही आश्वासन दिलेले नाही, मात्र एनआरसीबाबत मी माझे मत स्पष्टपणे मांडले आहे, असेही त्या म्हणाल्या.

मोदींची घेतली होती भेट
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींच्या राहत्या घरी जावून ममतांनी त्यांची भेट घेतली. यावेळी ममता यांनी पंतप्रधान मोदींना कुर्ता आणि बंगाली मिठाईची भेट दिली. या भेटीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी मोदींना बंगालमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. बंगालसाठी ममता बॅनर्जी यांनी 13500 कोटी रुपयांचा फंड मागितला आहे. ‘बंगाल’चे नाव बदलून ‘बांगला’ करण्यात यावे अशीही मागणी त्यांनी केली.