
पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष सर्वज्ञात असताना गेल्या दोन दिवसांत मात्र राजकीय चित्र बदलल्याचे दिसले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, तर गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यामागील गौड ‘बंगाल’ काय? याबाबत तर्कवितर्कांना ऊत आला आहे.
लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व नंतर गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांदरम्यान ममता यांनी मोदी आणि शहा यांच्यावर टीका केली होती. त्यावर मोदी आणि शहा यांनीदेखील ममता यांच्या टीकेला जशास तसे उत्तर दिले होते. तृणमूल काँगेस आणि भाजप यांच्यातील हा संघर्ष अचानक गायब कसा झाला, असा प्रश्न राजकीय निरीक्षकांना पडला आहे.
बंगाली भाषिकांसाठी आवाज उठवला – ममता
मी आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मुद्दा उपस्थित केला. एनआरसीच्या यादीत तब्बल 19 लाख लोक नाहीत. यात बंगाली भाषिकांची संख्या अधिक असल्यामुळे मी त्यांच्याबाबत आवाज उठवला, असे ममता बॅनर्जी यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले.

























































