ममता बॅनर्जींमध्ये पंतप्रधान बनण्याची क्षमता, प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची; नोबेल विजेते अमर्त्य सेन यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात पुढील पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले की 2024 च्या लोकसभा निवडणुका भाजपच्या बाजूने एकतर्फी होतील, असा विचार करणे चूक असेल. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका खूप महत्त्वाची असेल, असेही त्यांनी सांगितले.

मला वाटते की आगामी निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. द्रमुक,टीएमसी, समाजवादी पक्ष आणि इतर प्रदेशिक पक्षांचा चांगला प्रभाव आहे, तो वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपची जागा दुसरा कोणताही पक्ष घेऊ शकत नाही, असे समजणे चूक आहे. त्यांनी स्वतःला अशा पक्षाच्या रुपात समोर आणलंय, ज्याचा देशाच्या इतर भागांपेक्षा हिंदुंकडे अधिक कल आहे, असे अमर्त्य सेन स्पष्टपणे म्हणाले. पीटीआय भाषाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

भाजपने देशाचा दृष्टीकोन खूप कमी केला आहे. केवळ हिंदू आणि हिंदी भाषिक या विचारसरणीला अतिशय प्रकर्षाने स्वीकारून देशाच्या विचार संकुचित केले आहे. आज देशात भाजपला पर्याय दिला नाही तर ते दु:खाची गोष्ट ठरेल. मला वाटते की इतर राजकीय पक्षांनी खरोखर प्रयत्न केले एक चर्चा सुरू करू शकतात, ती बदलासाठी नवी सुरुवात ठरेल, असेही ते म्हणाले.

ममता बॅनर्जी या पंतप्रधान बनतील का असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यांच्यामध्ये पंतप्रधान बनण्याची क्षमता आहे. ममता एकसंघपणे भाजपविरोधातील जनतेतील निराशेची शक्ती खेचू शकतील, असे त्यांनी नमूद केले. 2024 च्या लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या काँग्रेसच्या क्षमतेवर सेन यांनी शंका उपस्थित केली. काँग्रेस ‘कमकुवत’ झाल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की हा एकमेव पक्ष आहे जो संपूर्ण देशाला दृष्टिकोन देऊ शकतो. काँग्रेस खूप कमकुवत झाली आहे आणि काँग्रेसवर किती अवलंबून राहू शकते हे मला माहीत नाही. मात्र, काँग्रेस निश्‍चितपणे अखंड देशाला दृष्टीकोन देते, जे इतर कोणताही पक्ष देऊ शकत नाही. पण, काँग्रेसच्या अंतर्गतच फूट पडली आहे,” असेही सेन यांनी सांगितले.