निवडणूक आयोग मेन व्हिलन, शंभर जागा लुटल्या; आम्ही हरलो नाही, कटकारस्थानाचे बळी ठरलो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आम्ही निवडणूक हरलेलो नाही. पश्चिम बंगालच्या लोकांनी आम्हाला नाकारले नाही. भाजप आणि निवडणूक आयोगाच्या कटकारस्थानाने आम्हाला ‘हरवण्यात’ आले,’ असा तुफानी हल्ला चढवतानाच तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय यंत्रणांवर तोफ डागली. ‘भाजपसाठी राबणारा निवडणूक आयोग मुख्य व्हिलन आहे. आमच्या किमान 100 जागा त्यांनी लुटल्या. त्यामुळे हा घोटाळेबाज निकाल मान्य करून मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही. संविधानानुसार जे काय करायचे ते करा. मी हटणार नाही, असे ठणकावतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांनी कारस्थानात सक्रिय भूमिका बजावल्याचा तडाखाही ममता यांनी लगावला.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी आज प्रथमच पत्रकार परिषद घेतली. प्रतिकूल निकाल लागल्यानंतरही त्यांच्यातील लढवय्या बंगाली वाघिणीचे दर्शन यानिमित्ताने झाले. भाजपशी लढाई सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि प्रामुख्याने निवडणूक आयोगावर त्यांनी घणाघाती प्रहार केला. सुमारे तासभर चाललेल्या या पत्रकार परिषदेत, तृणमूल काँग्रेस पुन्हा उसळी घेईल, असा ठाम विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.

भाजपने ही निवडणूक कशी लुटली याचा तपशीलच ममता बॅनर्जी यांनी मांडला. निवडणुकीच्या दोन दिवस आधी त्यांनी आमच्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली. ठिकठिकाणी धाडी टाकल्या. सर्व आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यासाठी भाजपधार्जिण्या लोकांची निवड केली. भाजपने थेट निवडणूक आयोगाशी संगनमत करून हा डाव खेळला. आम्ही संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध लढा दिला. पंतप्रधान आणि गृहमंत्री हेदेखील या खेळात सहभागी होते. त्यांचा थेट हस्तक्षेप होता. एसआयआरच्या नावाखाली मतदार यादीतून 90 लाख नावे वगळली. जेव्हा आम्ही न्यायालयात धाव घेतली तेव्हा त्यातील 32 लाख नावे पुन्हा समाविष्ट करण्यात आली. त्यांनी अत्यंत गलिच्छ, नीच आणि कुटील डावपेच खेळले,’ असा संताप ममतांनी व्यक्त केला.

बंगालच्या इतिहासातील काळा अध्याय

आम्ही भाजपच्या विरोधात लढत नव्हतो. भाजपसाठी काम करणाऱया निवडणूक आयोगाच्या विरोधात लढत होतो. केंद्रीय यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकाऱयांनी संगनमताने काम केले. छापे, बदल्या आणि पक्षपातामुळे संपूर्ण निवडणूक एकतर्फी झाली. माझ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी पाहिली नव्हती. बंगालच्या इतिहासातील हा काळा अध्याय आहे,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला.

मतदान संपल्यानंतरही ईव्हीएमची बॅटरी 80 टक्के चार्ज कशी?

निवडणूक आयोगाने ईव्हीएममध्येही झोल केल्याचा संशय ममतांनी व्यक्त केला. ‘मतदान प्रक्रिया संपल्यानंतरही ईव्हीएममधील बॅटरीची चार्ंजग 80-90 टक्के कशी असू शकते, असा सवाल त्यांनी केला. आयोगाने मतमोजणी केंद्रे हायजॅक केली. मतमोजणीचे सीसीटीव्ही फुटेज नाकारले जात आहेत. त्यांना नेमकं काय लपवायचे आहे, अशी विचारणाही त्यांनी केली.

राजीनामा देणार नाही, काय करायचे ते करा!

माझं संपूर्ण आयुष्य मी लोकांच्या सेवेसाठी वेचलंय. मागच्या 15 वर्षांत पेन्शनचा एक पैसा काढलेला नाही. एका पैशाचा पगार घेतला नाही.’

भाजप हटेल तेव्हा त्यांनाही हेच भोगावे लागेल!

‘तृणमूलच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांच्या घरावर हल्ले होत आहेत. पण आम्ही डगमगणार नाही. भाजप सत्तेतून जाईल तेव्हा त्यांनाही हेच भोगावे लागेल,’ असा सूचक इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.

उद्धव ठाकरे यांच्यासह ‘इंडिया’च्या नेत्यांचे फोन

निकालानंतर इंडिया आघाडीतील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी मला फोन केल्याचे ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले. ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मला फोन केला. आम्ही सगळे पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत आहोत, अशा शब्दांत त्यांनी धीर दिल्याचे ममतांनी सांगितले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि हेमंत सोरेन यांनीही माझ्याशी चर्चा केली. अखिलेश हे आजच बंगालमध्ये येणार होते. मात्र मी त्यांना उद्या येण्यास सांगितले आहे, अशी माहितीही ममता बॅनर्जी यांनी दिली.

इंडिया आघाडी मजबूत करण्याचा निर्धार!

राजकीय रणनीतीमध्ये बदल करण्याचे संकेतही ममतांनी यावेळी दिले. ‘माझे टार्गेट स्पष्ट आहे. इंडिया आघाडी मजबूत करण्यावर माझा भर असेल. एक साधी कार्यकर्ता म्हणून काम करेन. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना मला अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या. आता माझ्याकडे खुर्ची नाही. त्यामुळे मी खुर्चीचा गैरवापर करतेय असा आरोपही कुणी करू शकणार नाही. आता मी आझाद पंछी आहे. मला बरेच काही करायचे आहे आणि ते करणार,’ असा सूचक इशारा त्यांनी भाजपला दिला. मात्र पुढील रणनीती आताच उघड करण्यास त्यांनी नकार दिला.

सत्यशोधन समितीची घोषणा

निवडणूक काळात आणि नंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर अनेक अत्याचार करण्यात आले. तृणमूल भवन ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. पक्षाच्या कार्यालयांवर दगडविटांचा मारा करण्यात आला. ठिकठिकाणी झालेल्या या हिंसाचाराचे सत्य जाणून घेण्यासाठी दहा सदस्यीय सत्यशोधन समिती स्थापन करण्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली. या समितीत पाच खासदारांचा समावेश असेल. ही समिती हिंसाचारग्रस्त भागात दौरा करून त्याचा अहवाल जनतेसमोर ठेवेल. मीडियाने हे वास्तव लोकांपर्यंत न्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

ट्रम्प यांच्याकडून मोदींचे अभिनंदन

बंगालमधील भाजपच्या विजयाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. हा विजय ऐतिहासिक आणि निर्णायक असल्याचे ट्रम्प म्हणाले.

असे अराजक पाहिले नाही. केंद्रीय यंत्रणांचा असा बेछूट वापर कधी पाहिला नाही. न्यायपालिका नीट काम करू शकत नसेल, निवडणूक आयोगाला काम करता येत नसेल आणि केंद्र सरकारला एकाच पक्षाची राजवट हवी असेल तर अशा स्थितीत लोकशाही मार्गाने लढाई असंभव आहे. – ममता बॅनर्जी