
पश्चिम बंगाल विधानसभेच्या भवानीपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेस नेत्या, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी रविवारी विक्रमी 58,832 मतांनी दणदणीत विजय मिळवला. सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना हरवण्यासाठी अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ प्रचारात उतरवणाऱया भाजपचा ममतांनी ‘खेला’ केला. भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांना त्यांनी पराभूत केले. हा शानदार विजय मिळवून ममतांनी बंगालमध्ये आपणच सत्ताधीश आणि मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही आपलीच असल्याचे सिद्ध केले.
ममतांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. मुख्यमंत्रीपदाचा सहा महिन्यांचा कार्यकाल पूर्ण होण्याआधी विधानसभा सदस्यत्वासाठी त्यांना निवडणुकीत विजय मिळवणे गरजेचे होते. त्यानुसार भवानीपूरमधून विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून ममतांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची शाबूत राखली आहे. हा विजय मिळवत त्यांनी भाजपच्या स्वप्नांचे पानिपत केले. भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांनी स्वतःचा पराभव मान्य करीत ममतांचे अभिनंदन केले.
भवानीपूर हा ममतांचा गड मानला जातो. या पारंपरिक मतदारसंघातून त्या यापूर्वी दोन वेळा आमदार बनल्या आहेत. मे महिन्यातील निवडणुकीत या मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शोभनदेव चट्टोपाध्याय निवडून आले होते. त्यावेळी ममतांचा नंदिग्राम मतदारसंघातून पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरावे लागले होते. त्यांचे मुख्यमंत्रीपद कायम राखण्यासाठी चट्टोपाध्याय यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आपल्या मतदारसंघातून ममतांचा विधानसभेचा मार्ग मोकळा केला होता.
मिरवणूक काढू नका; कार्यकर्त्यांना आवाहन
ममतांच्या शानदार विजयानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर आनंद साजरा केला. एकमेकांना मिठाई भरवली. यावेळी ममतांनी घराच्या आवारातूनच कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि कुठेही विजयी मिरवणूक न काढण्याचे आवाहन केले. राज्यातील जनता पाऊस आणि पूराच्या संकटामुळे त्रस्त आहे. अशा परिस्थितीत जनतेपर्यंत मदत पोहोचवणे हीच विजयी मिरवणूक आहे, असे ममता म्हणाल्या.
माझ्याविरुद्धच्या षड्यंत्राला मतदारांनी जोरदार उत्तर दिले!
माझ्याविरोधात नंदिग्राममध्ये मोठे षड्यंत्र रचले गेले. विधानसभा निवडणूक सुरू झाल्यापासून माझ्या पक्षाविरुद्धही कारस्थाने रचण्यात आली. मी निवडणूक लढवू नये म्हणून माझ्या पायाला दुखापतही केली. या सर्व कारस्थानांना भवानीपूरच्या मतदारांनीच जोरदार उत्तर दिले आहे, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी विजयानंतर दिली. भवानीपूरमध्ये जवळपास 46 टक्के लोक बंगाली नाहीत. त्यांनीदेखील मला मतदान केले. मी दोन बोटे उंचावून विजयी निशाणी दाखवणार नाही, मी स्वार्थी नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
मतमोजणीत ममतांनी सुरुवातीच्या फेरीपासूनच आघाडी मिळवली होती. त्याच जोरावर त्यांनी संपूर्ण निकालानंतर 2011 च्या निवडणुकीपेक्षाही अधिक मताधिक्य मिळवण्याचा विक्रम नोंदवला. भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांना अवघ्या 20 हजारांच्या आसपास मतांवर गाशा गुंडाळावा लागला.































































