
सामना ऑनलाईन । मुंबई
रेल्वेत नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट-11 ने अटक केली. बबलूकुमार अशोककुमार तांती आणि अजयकुमार राय अशी त्या दोघांची नावे असून त्या दोघांनाही 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बनावट कागदपत्रे देऊन बेरोजगार तरुणाची फसवणूक झाल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे आली होती. पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकाने तपास करून राजेशकुमार अशोक तांती, मनीषसिंग वीरेंद्रसिंग ऊर्फ सरोजकुमार उदयभान राय आणि एका महिलेला अटक केली होती. त्यांच्या चौकशीत बबलूकुमार आणि अजयकुमारचे नाव समोर आले होते. उमेदवारांना वाराणसी येथे बोलावले जायचे. 20-20 जणांना प्रशिक्षणाच्या नावाखाली कोलकाता येथे न्यायचे. तेथील एका हॉस्पिटलमध्ये उमेदवाराची वैद्यकीय तपासणी करायचे. बबलूकुमार आणि अजयकुमार हे काम करायचे. कामाच्या मोबदल्यात त्या दोघांना रक्कम मिळायची. अटक केलेल्यांमध्ये एक जण हा मुख्य फरार आरोपीचा भाऊ आहे. त्या दोघांना बोरिवली आणि मीरा रोड येथून अटक करण्यात आली. पोलीस त्या दोघांची कसून चौकशी करत आहेत.
कामगार रुग्णालयात आगप्रकरणी आरोपपत्र दाखल
अंधेरीच्या राज्य कामगार रुग्णालयातील आगप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी 745 पानाचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सुरक्षेबाबत कंत्राटदाराने हलगर्जीपणा केल्याचे आरोप पत्रात पोलिसांनी नमूद केले. गेल्या वर्षी 16 डिसेंबरला कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत 2 लहान मुलांसह 14 जणांचा मृत्यू तर 100 जण जखमी झाले होते. या घटनेचा तपास एमआयडीसी पोलीस करत होते. 54 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते.




























































