
मंदिरात निघालेल्या व्यक्तीच्या डोक्यात रॉडने मारहाण करीत गळ्यातील पाच तोळ्यांची चैन हिसकावून पसार झालेल्या एकाला दत्तवाडी पोलिसांच्या पथकाने अटक केली. सिंहगड रस्त्यावरील निलायम पुल परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तर, त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. अशिष जितेंद्र दुबे (वय 21, रा. दत्तवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी दत्तवाडी परिसरात ही घटना घडली होती. याबाबत महेंद्र चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. चौधरी हे गंगेश्वर महादेव मंदिरात सोन्याची चैन घालून पूजा करण्यासाठी दररोज जात असतात.
त्यानुसार चौधरी यांच्यावर पाळत ठेवत आरोपींनी त्यांना लुटण्याचा प्लॅन केला. गुरुवारी सकाळी चौधरी हे मंदिरात जात असतानाच पाठीमागुन आलेल्या दोघांनी चौधरी यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांची चैन घेवून दोघेही पसार झाले होते. तेव्हापासून दत्तवाडी पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधात होते. या दरम्यान गुन्ह्यातील एक संशयीत आरोपी हा निलायम पुलाखाली येणार असल्याची माहिती हवालदार कुंदन शिंदे, पोलीस नाईक अमित सुर्वे, पोलीस शिपाई प्रशांत शिंदे यांना मिळाली होती. यानूसार त्यांच्या पथकाने सापळा रचून अशिष दुबे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदार दयानंद ऊर्फ गौतम देवेंद्र साळुंखे याच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले. यानूसार दुबे याला अटक करण्यात आले असून साळुंखे याचा शोध घेण्यात येत आहे. दुबे हा एक लॅब टेस्ट मध्ये काम करतो. तर, साळुंखे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे यांच्या पथकाने ही कारवाई केली.





























































