आशीष शेलार यांना धमकावणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

भाजप नेते ऍड. आशीष शेलार व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या कालरला मुंबई गुन्हे शाखेने पकडले. ओसामा समशेद खान (48) असे त्याचे नाव आहे.

आशीष शेलार व त्यांच्या कुटुंबीयांना दोन मोबाईल नंबरवरून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना याबाबत अर्ज देऊन तपास करण्याची विनंती केली होती. तसे वांद्रे पोलीस ठाण्यात शेलार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-9 च्या पथकाने तत्काळ समांतर तपास सुरू केला. शेलार यांना ज्या नंबरवरून धमकावण्यात आले होते त्या नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी माहीम कॉजवे येथे राहणाऱ्या ओसामा समशेर खान याला संध्याकाळी पकडले. शेलार यांना धमकावण्यासाठी ओसामाने त्याच्या आणि पत्नीच्या मोबाईल नंबरचा वापर केला होता. त्याच्याविरोधात एक गुन्हा दाखल असून त्याचा मुलगा कलम 307 च्या गुह्यात अटकेत आहे. वांद्रे रिक्लमेशन येथे त्यांची जमीन असून त्या जमिनीवरून म्हाडासोबत ओसामाचा वाद सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.