वन अधिकारी बनून बल्लारपूरच्या व्यापाऱ्याला 15 लाखांचा गंडा, आरोपीला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून अटक

मध्य प्रदेशातील हाऊमरिया टायगर प्रोजेक्ट येथे मी सहायक वन अधिकारी आहे व साईड बिझनेस म्हणून लाकडाचा व्यापार करतो, असे सांगून आरोपी सुधाकर जितेंद्रसिंग (वय 36, रा. दिलथरा, जिल्हा बालिया) याने बल्लारपूरचे लाकूड व्यवसायी लक्ष्मण वेलजीभाई पटेल यांच्याकडून लाकडाचा सौदा करून 15.5 लाख रुपये अॅडव्हान्स घेऊन लाकूड न पाठविता फसवणूक केली.

आरोपीला बल्लारपूर पोलिसांनी उत्तरप्रदेशातील वाराणसी येथून अटक केली. न्यायालयात हजर केले असता आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी तत्काळ तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा शोध घेतला व तपास अधिकारी प्रमोद रास्कर यांना पाठवले. परंतु आरोपी अटक टाळण्यासाठी वारंवार त्याचे ठिकाण बदलत होता.

त्यामुळे पोलीस तपासाला मर्यादा आली होती. मात्र पोलिसांनी विशेष कसब वापरून आरोपीला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून बल्लारपूर पोलीस ठाण्यात आणून अटक केली. ही कारवाई एपीआय रास्कर, रणविजय ठाकूर, राजेश सोनवाणे यांनी केली.

फसवणूक कशी झाली

लक्ष्मण पटेल हे बल्लारपुरातील जुने लाकूड व्यवसायिक आहेत. नऊ महिन्याआधी मध्य प्रदेशातील हाऊमरिया टायगर प्रोजेक्टमध्ये मी सहायक वन अधिकारी आहे व माझा लाकूड विक्रीचा व्यवसाय आहे, असे खोटे सांगून सुधाकर जितेंद्र सिंग याने पटेल यांची प्रत्यक्ष भेट घेतली. अनेक दिवस संपर्कात राहिला व विश्वास संपादन केल्यावर आरोपीने सागवान विक्रीचा सौदा केला. फिर्यादीकडून 15.5 लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून घेतले. अनेक दिवस उलटूनही लाकूड पाठवले नाही. फसवणूक झाल्याच लक्षात येताच पटेल यांनी पोलिसात धाव घेऊन फिर्याद नोंदविली.

आपली प्रतिक्रिया द्या